ग्रामसभा
जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात.
नागरिक १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदानाचा हक्क मिळतो. मग तो नागरिक आपसूकच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो त्याच्या मृत्यु पर्यंत सदस्य राहतो. . ग्रामसभेला निवडणूक असत नाही. त्या खेड्यातील प्रत्येक मतदार हा ग्रामसभेचा सदस्य असतो .
ग्रामसभेत उपस्थित राहण्याचा, सभेत मत, किंवा विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला हक्क आहे. ठराव बहुमतांनी पास किंवा नापास करण्याचा, मत देण्याचा हक्क प्रत्येकाला आहे.
जसे हे हक्क आहेत तसेच हे हक्क बजावण्याचे कर्तव्य प्रत्येक नागरिकांचे आहे. गावातील आपण सांगतो तशी ग्रामपंचायत चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा मनमानी कारभार चालेल.
अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ८ दिवस अगोदर ग्रामसभेला लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या,अगन्ठे घेतात. आणि सरपंच व ग्रामसेवक मनानेच त्याचे खोटे ठराव करून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही प्रत्यक्षात लोकांना माहिती होत नाही.
वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत.
२६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन
१ मे - कामगार दिन
१५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन
२ ऑक्टोबर - गांधी जयंती
या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. सभेच्या तारखेपूर्वी १० दिवस अगोदर ग्रामसभेची नोटीस बजावावी लागते. ग्रामपंचायत कार्यालयात हि नोटीस लावावी तसेच सर्वाना बघता येईल, व सहजपणे वाचन करता येईल अशा योग्य ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी लागते. आणि २ वेळा सभेच्या ८ दिवस अगोदर आणि सभेच्या १ दिवस अगोदर प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी ने हि माहिती द्यावी लागते.
सभेचा अध्यक्ष
आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो.
ग्रामसभेत कसे बोलावे ?
ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे.
सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे देण्याचा अधिकार नाही.
सभेचे कामकाज
ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार करील.
अत्यंत महत्वाचे -
पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची पोच घ्यावी.
ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. जसा ठराव झाला आहे तसाच लिहिला कि नाही कि बदल करून लिहिला आहे हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. नाहीतर ठराव होवून सुद्धा फक्त प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा ठराव लिहिणे असे प्रकार सर्रास घडतात.
आपण रोजगार, रस्ता, घरकुले, पाणी, वीज, गटार, शौचालये,शिक्षण , आरोग्य, रेशन, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न ग्रामसभेत मांडु शकतो व त्यावर चर्चा घडवून आणून ठराव करण्यास भाग पडू शकतो.
नियमितपणे
आपण जर ग्रामसभेत उपस्थित राहुन ग्रामसभेत सहभाग दिला आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपल्याला गावातील कोणत्याही अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात
आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे. तर राहिलेल्या ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडया , वस्तीवर घ्याव्यात असा संकेत आहे .
आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते.
आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे.
संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे.
जर ग्रामसभेच्या दिवशी लग्न / मयत किंवा महत्वाचे कार्यक्रम असतील तर निवेदन देवून नागरिकांच्या सोयीच्या दिवशी ग्रामसभा भरविण्यास सुचवता येवू शकते.
महिलांची ग्रामसभा
प्रत्येक ग्रामसभेपुर्वी १ दिवस अगोदर घेणे आवश्यक आहे. त्या सभेमध्ये झालेले जसेच्या तसे ठराव ग्रामसभेने मान्य करावेच लागतात.
जर इतीव्रूत्तात आपल्या ठरावाची नोंद नसेल तर ग्रामसभेचे विडिओ रिकोर्डिंग आपण मागवुन तपासुन पाहू शकतो.
सशक्त नागरीक सशक्त गाव .
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.