नोकरीत अपयश आता १० कोटींची कंपनी

नोकरीत अपयश आता १० कोटींची कंपनी 
------------------------------------------

चंद्रपूर येथील उद्योग वसाहतीत वनिता आहारचा उद्योग असून त्यांचे गुलाब जामून, ढोकळा, उकडपेंढी, मसाले, पापड व लोणचे विदर्भात चांगलेच प्रसिद्ध आहेत. आयएसओ 2200 मानांकन मिळविणाऱ्या वनिता आहारची उद्योग भरारी चकित करणारी आहे. विनायक धोटे यांनी सुरु केलेला हा उद्योग चांगलाच भरभराटीस आला आहे. नुकतीच या उद्योगाला भेट दिली. लघुउद्योगापासून सुरुवात झालेला हा व्यवसाय कसा भरभराटीस आला, याची यशोगाथा थक्क करुन गेली.

अन्नप्रक्रिया अभ्यासक्रमात बीएससी केल्यानंतर श्री. धोटे यांनी नोकरी सुरु केली. मात्र नोकरीत अपयश आल्यावर काय करावे या विवंचनेत असताना 10 किलो शेंगदाने, 10 किलो बेसन व 1 तेलाचा डबा घेऊन लघु उद्योग सुरु केला आणि आज वनिता आहार या ब्रँडसह 10 कोटींच्या वार्षिक उलाढालींसह नावारुपास आला आहे. प्रत्यक्ष 200 तर अप्रत्यक्ष हजारो लोकांना रोजगार दिल्याचे वनिता आहारचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक हरिश्चंद्र धोटे यांनी अभिमानाने सांगितले.

अन्न प्रक्रिया अभ्यासक्रमात बीएससी बीटेक केल्यानंतर कानपूर येथे नोकरी करणाऱ्या धोटे यांची नोकरी कंपनी बंद पडल्यामुळे गेली आणि आपण छोटा का होईना स्वत:चा उद्योग सुरु करावा अशी कल्पना त्यांना सुचली. यातूनच वनिता आहारची निर्मिती झाल्याचे श्री. धोटे यांनी सांगितले. केवळ तुटपुंज्या पैशात घरगुती मीठाचे पॅकिंग बनविण्याचा व्यवसाय सुरु करुन बाजारात विश्वासार्हता प्राप्त केली. आता वनिता आहार हे नाव ब्रँड झाले आहे. या व्यवसायात त्यांच्या पत्नी श्रीमती वनिता धोटे यांचा सहभाग व खूप मोठा हातभार आहे. वनिता आहारचा प्रशासकीय भार त्यांच्यावरच आहे.

वनिता आहारचा मुख्य ब्रँड गुलाबजामून मिक्स हा असून त्याला पुरक इतर पदार्थ आहेत. राजुरा तालुक्यातील सोंडो या छोट्याशा गावातून येऊन चंद्रपूर सारख्या शहरात आपला ब्रँड विकसित करणारे विनायक धोटे विदर्भभर परिचित आहेत. त्यांना जिल्हास्तरीय उद्योजकता पुरस्कारही प्राप्त झाला आहे. विदर्भ, मराठवाडा, खान्देश व मध्यप्रदेशातील काही भागातील बाजारपेठ वनिता आहारने काबीज केली आहे. शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन तसेच श्री. धोटे यांच्यासारख्या उद्योजकांकडून प्रेरणा घेऊन आज तरुणांनी उद्योजक होणे ही काळाजी गरज आहे.

http://www.aaharfoods.com/

https://www.facebook.com/AaharFoods/

- रवी गिते, जिल्हा माहिती अधिकारी, चंद्रपूर
------------------------------------------
सौजन्य : महान्यूज
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा
----------------------

Post a Comment

0 Comments