नववीत फक्त ४७ टक्के; आता ९ कंपन्यांचा मालक

नववीत फक्त ४७ टक्के; आता ९ कंपन्यांचा मालक
-------------------------------------------------------------------
इयत्ता नववीमध्ये केवळ ४७ टक्के मिळाल्यानंतर अवघ्या २० वर्षांत नऊ आयटी कंपन्यांचा मालक बनण्याची किमया धुळे येथील अनिवासी उद्योजक संजीवकुमार विनायक दहिवदकर यांनी केली आहे. नववीच्या वर्गात कमी टक्के मिळाल्यामुळे दहिवदकर यांना शिक्षकांनी शिकवणीसाठी नकार दिला होता. याप्रसंगामुळे हतबल होता चिकाटी, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी ही भरारी घेतली आहे. २० वर्षांतील त्यांच्या या यशाचा प्रवास चित्तवेधक आणि प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे दहिवदकर हे या उद्योगातून मिळालेल्या पैशांचा उपयोगही भारतातील कमी गुणमिळवणाऱ्या मुलांच्या विकासासाठी करतात. दहिवदकर यांच्या बालपणीच आईचे छत्र हिरावले गेले. एकत्र कुटुंब पद्धतीत घर चालवताना त्यांच्या वडिलांची दमछाक होत असे. त्यामुळे उद्योग करण्याचे विचार बालपणापासून येत होते.
मिसरुड फुटलेला संजीव मग दिवाळीच्या दिवसांमध्ये वडिलांकडून १०० रुपये घेऊन फटाक्यांचे सँपल विकत अाणायचा.धुळ्यात घरोघरी जाऊन ते सँपल दाखवायचे आणि त्यानंतर माल आणून संजीव ते विकायचा. मित्रांसोबत भागीदारीत असलेल्या या व्यवसायातून त्या काळी ते हजार रुपये मिळत होते. या पैशांतून त्यांनी शिक्षण घेतले. १९८० च्या दशकात ते दहावी उत्तीर्ण झाले. त्या वेळी संगणकाचे वारे वाहण्यास सुरुवात झाली होती. १९८९ मध्ये पदवी मिळाल्यानंतर त्यांनी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यासक्रम धुळ्यात पूर्ण केला. त्यानंतर एम.सी.एस.साठी त्यांनी पुणे विद्यापीठात नाव नोंदवले .काहीकाळ पुण्यात शिक्षण,आैरंगाबादेत नोकरी अाणि दर रविवारी धुळ्यात प्रोग्रामरचे क्लासेस, अशी तिहेरी कसरतही केली. सन १९९२ मध्ये एमसीएस झाल्यानंतर त्यांनी प्रख्यात डेल कॉम्प्युटर कंपनीच्या सौदी अरेबियातील मुख्यालयात नोकरी केली. सन १९९५ मध्ये अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. अमेरिकेत जाण्याचा निर्णय आयुष्याला निर्णायक वळण देणारा ठरला.

कमी हुशार मुलांना मदत : हुशार मुलांना शिष्यवृत्ती मिळते. मात्र, अभ्यास यथातथाच असणाऱ्या मुलांसाठी खान्देशातील आशा फाउंडेशनमार्फत करिअर मार्गदर्शन,आर्थिक मदत केली जाते. याशिवाय इंडिया फाउंडेशन या संस्थेमार्फत ग्रामीण भागातील मुला-मुलींना साॅफ्टस्कील, व्यक्तिमत्त्व विकास, व्यावसायिक जीवनाचे प्रशिक्षण, माहिती दिली जाते. पत्नी योगिनी अाणि दोन मुली अबोली आणि पूजा असे दहिवदकर यांचे चौकोनी कुटुंब आहे.

टर्निंग पाॅइंट: वाॅलमार्ट या जगप्रसिद्ध रिटेल उद्योगात प्रोग्रामर म्हणून काहीकाळ काम केल्यानंतर संजीव यांनी तीन वर्षे बँकिंग, घर कर्ज, कायदेविषयक सल्लागार कंपनीत काम केले. बँकिंग सेवा, घरकर्जासंबंधीची प्रकरणे हाताळण्यासाठी साॅफ्टवेअर तयार करणारी कंपनी ‘एमएसटीडी’ स्थापन करण्याची कल्पना त्यांना सुचली. तोपर्यंत अमेरिकेतही अशा प्रकारची सेवा कायदेविषयक तज्ज्ञ देत होते. मात्र, सॉफ्टवेअर तयार केल्यास कुणीही सामान्य माणूस हे काम करू शकेल, अशी त्या मागची कल्पना होती. संगणकाचा हा उपयोग करण्याचा त्यांचा हा होरा अचूक ठरला. महाराष्ट्रातील म्हाडा, सिडकोप्रमाणे अमेरिकेतील हाऊसिंग अर्बन डेव्हलपमेंट या कंपनीने आपल्या बँकांसाठी हे सॉफ्टवेअर वापरण्याची शिफारस केली आणि दहिवदकर यांचे नशीब पालटले.

मुलांना अार्थिक मदत

सन २००१ मध्ये IndiSoft नावाची कंपनी सुरू केली. आज दहिवदकर यांच्या अमेरिकेत 4 आणि 5 भारतात कंपन्या आहेत. त्या मुंबई, पुण्यात अाहेत. याशिवाय आशा फाउंडेशन या समाजसेवी संस्थेमार्फत तरुण,होतकरू मुलांना आर्थिक मदत, करिअर मार्गदर्शन केले जाते.

मार्केटिंग विभागच नाही : दहिवदकर

आजचे युग हे मार्केटिंगचे युग असल्याचे म्हटले जाते पण दहिवदकर यांच्या कंपन्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कंपनीत मार्केटिंग हा विभागच नाही. प्रामाणिकपणा आणि ग्राहकांना उत्तम सेवा ही माझ्या कामातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे माझ्या कंपनीत मार्केटिंग विभागच नाही, असे संजीव दहिवदकर यांनी अभिमानाने सांगितले.
------------------------------------------------------------------

Post a Comment

0 Comments