पेपर टाकणारा लहानगा आज आहे १६०० कोटींच्या कंपनीचा मालक


------------------------------------------

कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा. अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं.

मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट अख्खी मुंबई. पुण्यातील कसबा पेठेत वाढलेल्या दीपक नावाच्या मराठी मुलाने कफ परेड भागात बत्तीस मजल्यांचा अवाढव्य टॉवर बांधलाय. कसबा पेठ म्हणजे तेला तांबोळय़ांची वस्ती, असं खुद्द लोकमान्य टिळक म्हणत. पेपरची लाइन टाकून, टेलिफोन पुसत, अपार कष्ट करून तेला तांबोळय़ांच्या वस्तीतून लहानाचा ‘मोठ्ठा’झालेला दीपक आज सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे.

पूर्ण नाव दीपक सखाराम कुलकर्णी. वय ५५ ते ६०च्या अध्येमध्ये. त्यांनी मुंबई-पुण्यापासून, हैदराबाद, चेन्नई, अमेरिकेपर्यंत सर्वत्र घरं बांधली आहेत. पुणे-मुंबई प्रवासात, दिवसभराच्या मीटिंग्ज आणि बिझी शेडय़ूलमध्येही त्यांचा तजेलदार चेहरा, नीटनेटका पोशाख, मुख्य म्हणजे गळय़ातली टाय नजरेत भरते.

‘‘टेलिफोन बिझनेसमध्ये टाय लावायला शिकलो.’’ सव्वीसाव्या मजल्याच्या छोटेखानी टेरेसवर फोटोशूटसाठी संपूर्ण सहकार्य करत दीपक कुलकर्णी क्षणार्धात गप्पांच्या मूडमध्ये शिरतात. ‘‘टेलिफोन पुसत असताना ओळखी होत गेल्या. ‘ब्ल्यू डायमंड’चे पी. एल. किलरेस्कर म्हणाले, ‘तू ताजला का नाही जात? मी चिठ्ठी देतो, तुझं काम होईल.’ मी गेलो. हातात किलरेस्करांची चिठ्ठी. अंगावरचा वेश गबाळा. हाफ बुश शर्ट, बिनइस्त्रीची बेलबॉटम, पायात स्लीपर्स. दरवाजातच अडवलं. गुरख्यासाठी पेहेरावाचं इम्प्रेशन अधिक महत्त्वाचं होतं. पुन्हा किलरेस्करांसमोर उभा राहिलो. त्यांनी तिथल्या तिथे शंभर रुपये काढून दिले. म्हणाले, ‘आजपासून स्वच्छ इस्त्रीची पॅण्ट. फुल शर्ट, पायांत बूट, चप्पल विसरायची आणि टाय वापरायची. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसारखा वेश हवा. कुणी अडवणार नाही.’१९७१-७२ ची ही गोष्ट असावी. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून आजतागायत टाय लावला आहे. मधल्या काळात काढला होता. १९८० साली बिल्डर झालो, तेव्हा पांढरा सफारी चढवला. टिपिकल बिल्डरचा ड्रेस. गळय़ात गोफ एकदम झकपक. सलमान खानच आम्ही जणू. मग माझ्या लक्षात आलं, आपण लोकांपासून दूर जातोय. नाइलाज म्हणून लोक येतायत, धंदा होतोय, पण लोकांना आपलेपणा वाटत नाहीय. पुन्हा जुन्या पेहेरावावर आलो.’’

आज कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दीपक कुलकर्णी यांनी सुरुवात कशी व कुठून केली? त्यांचा पहिला बिझनेस कोणता? कुलकर्णी तपशीलवार सांगू लागतात.

‘‘वडील पोलिस खात्यात. आई शिक्षिका.

आई बिचारी दिवसभर कष्ट करायची. आम्ही तीन भाऊ, आमची एक बहीण. आमची आई सकाळी निघायची, आमचा पूर्ण स्वयंपाक करून. शिकवण्या, शाळा, पुन्हा शिकवण्या. घरी येताना बेतलेले कपडे घेऊन यायची. आमच्याकडे हप्त्यावर घेतलेलं शिलाई मशीन होतं. बेतलेले कपडे म्हणजे लहान मुलांच्या चड्डय़ाबिड्डय़ा. त्या शिवून दिल्या की, डझनाला सहा आणे मिळत. तिचा दिवस कष्टात निघून जायचा. आम्ही म्युनिसिपल शाळेत. पंचवीस नंबरची शाळा. आमचं घर म्हणजे जेमतेम दीड खोली. शाळा सकाळ-दुपार शिफ्टमध्ये, उरलेला वेळ मित्रांसोबत.

माझ्या मित्रांच्या वडिलांचे छोटे-मोठे व्यवसाय होते. एकाची चन्यामन्या फुटाण्याची गाडी होती. दुसरा सुगंधी सुपाऱ्यांच्या पुडय़ा भरत असे. मग मी एकासोबत चन्यामन्याची गाडी लावायचो, शनिवार पेठेतल्या अहिल्यादेवी मुलींच्या शाळेसमोर आणि दुस-याला सुपारीची परात भरायला मदत करायचो. माझ्या दोन्ही मित्रांचे वडील महिन्याला दोन-तीन रुपये देत.

अशा प्रकारे मला दरमहा पाच ते सहा रुपये मिळू लागले. दिवाळीत आमचे वडील आम्हा चार भावंडांना मिळून पाच रुपयांचे फटाके आणत. आम्ही त्याची वाटणी करत असू. मग मी म्हणायचो, ‘दादा, माझेपण सात रुपये आहेत. पाच रुपयांचे तुम्ही फटाके आणा. सात रुपयांची आपण घरासाठी एखादी छान वस्तू आणू.’ तो आनंद वेगळा होता.’’

सोळाशे कोटींचं साम्राज्य असणाऱ्या दीपक कुलकर्णीच्या डोळय़ांत सात अधिक पाच रुपयांचा ‘तो’ आनंद चमकून जातो.

‘‘मी पेपर टाकण्याची लाइन निवडली. ही माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची

नोकरी. पाच किंवा दहा रुपये महिन्यावर (आता नक्की आठवत नाही) मी पेपरवाला पोऱ्या झालो. १९५८-५९ सालची गोष्ट सांगतोय मी. एकदा कधी तरी मी साडेपाचऐवजी सव्वासहाला पोहोचलो. मालकाने खाडक्न माझ्या मुस्काटीत मारली. ‘ही काय यायची वेळ झाली? माझं गिऱ्हाईक गेलं.’ त्या दिवशी माझी पहिली आणि शेवटची नोकरी गेली. मुस्काटीत खाल्ली. अपमान झाला. माझी स्वत:ची पेपर लाइन काढली. तो माझा पहिला व्यवसाय.

होलसेलवर पेपर घ्यायचो, कमिशन मिळायचं. पूर्वी अकरावी (मॅट्रिक) चा रिझल्ट पेपरमध्ये छापण्याची पद्धत होती. मॅट्रिकचा रिझल्ट सायकलला बांधला. कॅम्पात जाऊन एक आरोळी ठोकली की, दहा मिनिटांत चटणीसारखे पेपर संपायचे. चार आण्याचा अंक बारा आण्याला विकला जात असे. त्या दिवशी ‘प्रीमिअम’ काय असतं, ते लक्षात येत असे. आम्ही त्या दिवसाची वाट बघत असू.

एका वर्षी पायजम्याच्या दोन्ही खिशात मिळून ऐंशी रुपये होते. सगळी चिल्लर, मी दोन्ही हातांनी घट्ट धरली होती. त्यापुढे आजचे आठ की सोळा की बत्तीसशे कोटी रुपये फिक्के आहेत.’’

दीपक कुलकर्णी थांबतात. आज मागे वळून पाहताना, व्यवसायात मिळालेला टर्निग पॉइंट त्यांना नेमका कोणता वाटतो? ठराविक एखादा प्रसंग किंवा घटना, ज्यामुळे त्यांचा

भविष्यातला मार्ग सुकर झाला.

‘‘ एम. एस. कॉलेजला प्री-डिग्री (किंवा एफवाय)ला असताना आम्हा विद्यार्थ्यांना सुट्टीत दीड-दोन महिन्यांकरिता एखाद्या कारखान्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंगला पाठवत. मला ‘किलरेस्करऑइल इंजीन’मध्ये पाठवण्यात आलं. तळमजल्यावर त्यांचं टेलिफोन एक्सचेंज होतं. मोठे लाकडी बोर्ड, जाड सुतळीच्या वायर्स, कानाला भलेमोठे ‘इअरफोन्स.’ सोनपट्टी नावाचे इन्चार्ज होते. म्हटलं, ‘मला शिकवाल का?’ पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्या तोंडाजवळ (इअरफोनसकट) माईक धरला आणि मी तोंड वळवत हाताने तो ढकलून दिला. त्याला डेटॉलचा उग्र वास येत होता. दर तीन मिनिटाला ऑपरेटर बदलला जात असे आणि टेलिफोन पुसून आत डेटॉलचा बोळा ठेवण्यात येई. माझ्या मनात विचार आला की, डेटॉलऐवजी यात अत्तराचा बोळा ठेवला तर?

माझ्या मैत्रिणीला मी हे सांगितलं. मैत्रीण म्हणजे जिच्यावर मी प्रेम केलं आणि विसाव्या वर्षी जिच्याशी लग्न केलं ती, माझी मैत्रीण- (पत्नी) ज्योती. तिने माझी कल्पना उचलून धरली. एफवायला आमचं प्रेम जमलं. तिची आर्थिक परिस्थिती बिकट.आम्ही गुपचूप लग्न केलं. मी माझ्या घरी परत आलो आणि ती नारायण बागेतल्या महिलाश्रमाच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. मी सेकंड इअर बीकॉमला. मला नोकरी नाही. पेपरची लाइन टाकणं हा काही बिझनेस होऊ शकत नव्हता. मी कोणत्या तोंडाने आई-वडिलांना सांगणार होतो? त्यातून माझ्या मोठय़ा भावाचं आणि मुख्य म्हणजे मोठय़ा बहिणीचं लग्न व्हायचं होतं.

टेलिफोनची आयडिया मी माझ्या पत्नीला सांगितली आणि आज इतक्या वर्षानी मी उघडपणे सांगू शकतो की, तिने ती आयडिया डेव्हलप करून पूर्णत्वाला नेली. भांडवलाची आवश्यकता होती. ६५ ते ७० रुपये आणायचे कुठून? तिच्या वडिलांनी तिला कानातले इअरिंग्ज दिले होते, तिच्यापाशी ट्रान्सिस्टर होता.

तिने दोन्ही गोष्टी विकल्या. ७२ रुपये मिळाले. ते आमचं पहिलं भांडवल. आमचा पहिला बिझनेस सुरू झाला. ‘टेलिफोन क्लिनिंग सव्‍‌र्हिस’- ‘टेलिस्मेल.’ तो कमालीचा क्लिक झाला. पुण्यात एकमेव ‘टेल्को’ वगळता बाकी सर्व इंडस्ट्रीत आम्ही जात होतो. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडली, तर सगळय़ा बँकांच्या शाखांचे टेलिफोन आम्ही पुसत होतो.

अत्तराचा वास, सात दिवस टिकत असे. आठवडय़ातून एकदा, महिन्यातून चार वेळा एक फोन पुसायचे आम्हाला तीन रुपये मिळत. फोन जास्त असतील, तर दोन ते अडीच रुपये. दिवसाला दीडशे फोन आम्ही दोघं मिळून सहज पुसत असू. आमचा टर्नओव्हर होता दिवसाला सरासरी पंच्याहत्तर ते शंभर रुपये . महिन्याला सरासरी दोन हजार रुपये. दोन हजारांत नेट प्रॉफिट होता बाराशे ते चौदाशे रुपयांचा.

मी १९७० सालातली गोष्ट सांगतोय. बँकेचा मॅनेजरदेखील तेव्हा दरमहा हजार-अकराशे रुपये कमावत होता आणि मी बीकॉमच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी. बाराशे रुपये कमावत होतो. दिवसभर कष्ट केल्यामुळे झोपही छान लागत होती.’’

बिल्डर व्यवसायात शिरण्यायोग्य परिस्थिती कधी निर्माण झाली?

‘‘गरजेपोटी मार्ग सापडत जातात. मला ऑफिस हवं होतं. स्वस्तात कुणी टेबलस्पेस देईल का, या शोधात होतो. अलका टॉकीजशेजारी एका ऑफिसमध्ये टेलिफोन पुसायला जात होतो. त्या मालकाला विचारलं- तो म्हणाला, ‘जागेला रंगबिंग लाव, इंटिरिअर कर. मग तू बस.’ इंटिरिअर डिझायनरचे पैसे परवडेनात. मग मीच रंगाचं कॉण्ट्रॅक्ट घेतलं. ६६ रुपयांत काम झालं. कॉण्ट्रॅक्टरने स्क्वेअर फूटच्या हिशेबाने घेतले असते १०० रुपये. जवळपास चाळीस टक्के फायदा. मी या धंद्यात शिरलो. ‘पेंट ऑल’ ही माझी कंपनी होती. एकदा किलरेस्करांचा बंगला रंगवताना डोक्यावरचं छप्पर गळायला लागलं. (फॉल्स सीलिंग) त्यांचे इंजिनीअर वगैरे आले. मला म्हणाले, ‘दहा दिवसांनी या, आधी सीलिंग नीट होऊ दे.’ म्हटलं, भविष्यात आपण वॉटर प्रुफिंग करून द्यायचं. अनेक ठिकाणी रंगाऱ्यासह ठरलेल्या तारखेला उपस्थित राहिलो की, फ्लॅटमालक सांगणार, ‘पुढल्या आठवडय़ात या.

अजून फर्निचर व्हायचंय.’ रंगाऱ्यांची मजुरी घरबसल्या अंगावर पडू लागली. मनाशी ठरवलं, आपणच फर्निचर करायचं. वॉटर प्रुफिंग, प्लम्बिंग, जुनी फरशी बदलून देणं (फ्लोअरिंग), मेन गेट लोखंडी करणे या सर्व गोष्टी मी करू लागलो. १९७३ ते १९८० घरातला कोपरा न् कोपरा दुरुस्त करू लागलो, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, लोकांनी बिघडवलेलं घर दुरुस्त करण्यात आपली ताकद घालवतोय. त्याऐवजी स्वत:च घर बांधू लागलो तर? आणि ८० साली मी बिल्डर झालो. ‘अर्बन लॅण्ड सीलिंग’ होतं.

३३०, रास्ता पेठ. मी विकत घेतलेला पहिला वाडा आजही माझ्या डोळय़ांसमोर आहे.’’ बोलता बोलता दीपक कुलकर्णी थांबतात. त्यांना पुढच्या अडीच तासांत कफ परेडहून पुणे गाठण्याची घाई असते. ‘‘एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न आहे. तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही नाही आलात, तर मी पंक्तीला बसणार नाही.’ ही माझी कमाई आहे. फ्लॅटहोल्डर्स मला ‘आपले’ वाटतात. त्यांच्या घरी जातो, बसतो, कांदे-पोहे खातो. एरवी बिल्डर आणि फ्लॅटहोल्डर्स यांचा काडीचा संबंध उरत नाही, म्हणूनच आजच्या मंदीचा आमच्याशी काही संबंध नाही.

आमचा अलिखित नियम आहे- ‘इन्व्हेस्टर्स- ब्रोकर्स नॉट अलाऊड.’ ब्रोकर्सना आम्ही फ्लॅट विकत नाही. बिझनेसच्या चौकटीबाहेर खूप गोष्टी करायच्या आहेत. मला लेखन करायचंय, मला (ओल्ड) महाबळेश्वरला जाऊन लेखन करायला आवडतं. चालणं हा माझा छंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माझी भक्ती आहे. विज्ञानावर निष्ठा आहे.

अगदी माझा पहिला खरेदी केलेला रास्ता पेठेतला वाडा, अपशकुनी म्हणून इतर बिल्डर्स नाकारत होते, मी घेतला तोही विज्ञानाच्या निष्ठेपोटी. दोन इच्छा प्रबळ आहेत. अमेरिकेतलं ‘मॅन हॅटन’ म्हणजे आम्हा बिल्डर लोकांची काशी, पंढरी. तिथे दीडशे मजल्यांची बिल्डिंग बांधायची आहे. ऑलरेडी न्यू जर्सीपर्यंत पोहोचलोय आणि दुसरी इच्छा म्हणजे मला पेढी काढायचीय- ‘दीपक सखाराम आणि मंडळी, सोन्या-चांदीचे व्यापारी’ अशी बाहेर पाटी हवी. मला छान तलम धोतर नेसायचंय, जुन्या काळातला डगला शर्ट घालायचाय, डोक्यावर टोपी घालून पेढीवर येणाऱ्या लोकांचं स्वागत करायचंय.’’ क्षणभर पॉझ घेतात, डोळे मिचकावून मिश्कीलपणे म्हणतात, ‘‘आणि सध्या मी पुण्याला निघालोय. शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाला, नाही तर त्याला वाईट वाटेल.’’ सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक, चालक, सर्वेसर्वा एका शेतकऱ्याचं मन राखण्याकरिता म्हणून पुण्याच्या वाटेने भरधाव सुटला. हीच ओळख कायम राहावी याकरिता कायम झटत असतात आणि घरापेक्षा घरपण राखलं जावं म्हणून जिवापाड मेहनत करतात पुण्याचे दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके.

- अभिजीत देसाई
सौजन्य : अभिजीत देसाई ब्लॉग
------------------------------------------

Post a Comment

0 Comments