साध्या वेफर्स विक्रीतून उभारली १२०० कोटींची कंपनी ! - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, September 23, 2016

साध्या वेफर्स विक्रीतून उभारली १२०० कोटींची कंपनी !

साध्या वेफर्स विक्रीतून उभारली १२०० कोटींची कंपनी !
------------------------------------------

गुजरातमधील जामनगर जिल्हा काहीसा दुष्काळग्रस्त भाग. याच भागातील कलावड तालुक्यातील धुंधोराजी हे २००० लोकवस्ती असलेलं खेडेगाव. या गावातील पोपटभाई विराणी आपल्या कुटुंबासह शेतीवर गुजराण करत होते. आणि १९७२ चा तो भयंकर दुष्काळ पडला. पावसाचा थेंब नव्हता. शेती करणं अवघड झालं होतं. पोपटभाईंनी आपली पिढीजात जमीन विकून २० हजार रुपये आपल्या मुलांना व्यवसाय करण्यासाठी दिले. ही मुले राजकोटला आली. शेतीची पार्श्वभूमी असल्याने शेतीशी संबंधित काहीतरी व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले. त्याप्रमाणे त्यांनी खते आणि कृषीविषयक साधने खरेदी केली. विकताना मात्र ही खते बनावट असल्याचं कळलं. विराणी बंधूंसाठी हा फार मोठा धक्का होता. वडलांनी वडिलोपार्जित जमीन विकून व्यवसायासाठी पैसा दिला होता. फसवणुकीमुळे पैसा पण गेला होता.

आता पुढे काय करायचं हा यक्षप्रश्न होता. विराणी बंधूंनी एक कॉलेज कॅन्टीन चालवायचं ठरवलं. यावेळी चंदुभाई अवघा १७ वर्षांचा होता. ज्यावेळेस कॉलेज मध्ये पहिलं पाउल ठेवायचं वय असतं त्यावेळी हा किशोरवयीन मुलगा कॅन्टीनमध्ये काम करायचा. मात्र लवकरच हे कॅन्टीनसुद्धा बंद पडलं. १९७४ मध्ये विराणी बंधू राजकोटमधील ऍस्टन सिनेमागृहाच्या कॅन्टीनमध्ये नोकरीस लागले. कॅन्टीनमध्ये काम करता करता ही मुले तिकीट खिडकीवर तिकीटे देखील विकायची. कधी कधी डोअरकीपरचे काम देखील करायची. त्यांच्या या कष्टाळू स्वभावाने सिनेमागृहाचे मालक गोविंदभाई खूष झाले. १९७६ मध्ये त्यांनी विराणी बंधूना कंत्राटी पद्धतीवर कॅन्टीन चालविण्यास दिले. सुरुवातीला ते वेफर्स स्थानिक विक्रेत्याकडून खरेदी करत आणि विकत. मात्र यामध्ये काहीच पैसे सुटत नव्हते. नवऱ्याला व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांच्या बायका देखील आल्या. त्या टोस्टेड सॅण्डविच तयार करायच्या. १९८२ साली त्यांनी एक तवा घेतला आणि बटाटा वेफर्स तयार करुन विकू लागले. हा चंदूभाई विराणी आणि त्यांच्या बंधूच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा ठरला.

बटाटयाच्या वेफर्स मध्ये फायदा आहे हे त्यांच्या ध्यानी आले. फक्त कॅन्टीनपुरतं मर्यादीत न राहता आता हे वेफर्स दुकानांत देखील विकण्याचे त्यांनी ठरविले. त्यासाठी त्यांनी या वेफर्सला ‘बालाजी’ (https://www.facebook.com/BalajiWafers) हे नाव दिलं. चंदुभाई हे हनुमानाचे निस्सीम भक्त आहेत. पैसे वसुली हा एक मोठा या व्यवसायातील अडसर होता. काही दुकानदार तर त्यांना भिकाऱ्याची वागणूक देत. मात्र याची तमा न बाळगत शेवटचा ग्राहक संतुष्ट झाला पाहिजे या एका ध्येयाने चंदु आणि विराणी बंधूंनी स्व:ला झोकून दिले. एका दुकानापासून सुरुवात करत २०० निष्ठावान ग्राहकांपर्यंत हा आकडा गेला. दरम्यान त्यांनी वेफर्स बनविण्यासाठी एक कूक पण कामावर घेतला. मात्र त्याच्या नेहमीच्या सुट्ट्यांमुळे विराणी बंधूंनाच हे वेफर्स तळावे लागत. मागणी वाढत असल्याने त्यांनी वेफर्स तयार करणारी यंत्रे आणि तंत्र खरेदी केले. १९८२-१९८९ दरम्यान व्यवसाय वाढला मात्र नफा तसाच वेफर्सप्रमाणे बारीक राहिला.

१९८९ मध्ये बॅंकेतून ३.६० लाख रुपयांचं कर्ज घेऊन त्यांनी १००० मीटरची जागा विकत घेतली. २ तव्याचे आता ८ तवा झाले. तीन वर्षांत त्यांच्या व्यवसायाची उलाढाल ३ कोटी रुपये झाली. याच वेळी त्यांनी प्रति तासाला १००० किलो वेफर्स तयार करणारे ५० लाख रुपयांचे स्वयंचलित यंत्र खरेदी केले. मात्र वारंवार हे यंत्र बिघडायचे. अनेक महिने काहीही उत्पादन करता हे यंत्र तसेच पडून राहिले. मात्र हार न मानता त्यांनी प्रयत्न चालूच ठेवले. शेवटी ते यंत्र नीट करण्यात त्यांना यश आले. २००३ मध्ये १२०० किलो प्रति तास वेफर्स तयार करणारे यंत्र त्यांनी बसविले. मात्र पूर्वाश्रमीचा अनुभव त्यांच्या गाठिशी असल्याने यावेळी अपयश त्यांना पहावे लागले नाही. २००० ते २००६ दरम्यान गुजरात मधील ९० टक्के वेफर्सची बाजारपेठ बालाजीने काबीज केली. नमकीन मध्ये सुद्धा ते आघाडीवर होते. आज बालाजी दरदिवशी साडेचार लाख किलो बटाट्याच्या वेफर्सची तर ४ लाख किलो नमकीनची निर्मिती करते. दररोज तब्बल ३ लाख वेफर्सच्या पाकिटांची निर्मिती केली जाते.

एका तव्यानिशी सुरु झालेला बालाजीचा हा व्यवसाय वलसाडच्या ३५ एकर जागेत स्थिरावलाय. सुरुवातीला ३ कामगार होते तर आज प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या अडीच लाख लोकांना बालाजी रोजगार देत आहे. एवढंच नव्हे तर बालाजीचा हा व्याप अमेरिका, लंडन आणि युरोपात देखील विस्तारला आहे. परदेशात बालाजीचे ६०० च्या वर वितरक आहेत. तब्बल ४० हून अधिक देशात बालाजी वेफर्स विकले जातात.

बालाजी आपल्या कर्मचाऱ्यांना एक कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच वागविते. कंपनीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी ७० टक्के कर्मचारी महिला आहेत. बालाजी त्यांना दुपारचं जेवण अवघ्या १० रुपयांमध्ये पुरविते. संकटसमयी वा त्यांच्या गरजेच्यावेळी कंपनी पूर्णपणे त्यांच्या पाठिशी उभी राहते. बालाजी कंपनीची वाटचाल एक अभ्यासच आहे. त्यामुळेच दररोज शाळा आणि महाविद्यालयांचे विद्यार्थी बालाजीला भेट देत असतात. चंदुभाई स्वत: या मुलांसोबत संवाद साधतात. त्यांच्या शंकांचं निरसन करतात. कलावड रोड कारखान्यानजिक एक मोठी गोशाला देखील आहे. या गोशालेत २०० ते ३०० गायींची निगा राखली जाते.

निव्वळ ९ वी पर्यंत शिक्षण झालेले चंदुभाई १२०० कोटी उलाढाल असलेला हा बालाजी उद्योगसमूह (http://www.balajiwafers.com/) सांभाळत आहेत. दुष्काळाला न डगमगणारे चंदुलालचे वडिल पोपटलाल आणि वारंवार अपयश येऊन देखील न डगमगता व्यवसाय करणारे चंदुलालचे अन्य बंधू यांच्यामुळेच आज ‘बालाजी’ने वेफर्सच्या जगात अढळ स्थान मिळविले आहे.

-

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages