पितृछत्र हरपलेल्या ग्रामीण गरीब बंधूनी उभारला २२०० कोटींचा पोल्ट्री उद्योग - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, October 14, 2016

पितृछत्र हरपलेल्या ग्रामीण गरीब बंधूनी उभारला २२०० कोटींचा पोल्ट्री उद्योग

पितृछत्र हरपलेल्या ग्रामीण गरीब बंधूनी उभारला २२०० कोटींचा पोल्ट्री उद्योग
------------------------------------------
‘हिंमत-ए-मर्दा तो मदद-ए-खुदा’ अशी उर्दू भाषेत एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की ज्या व्यक्तीकडे हिंमत आहे, जो हिंमतीने कोणत्याही परिस्थितीला सामोरे जातो. त्याच्या मदतीला देव सदैव तत्पर असतो. ही म्हण आठवण्याचं कारण म्हणजे बहादूर अली. लहानपणी अकाली बाबांचं निधन झालं. कुटुंबाचा सगळा भार अंगावर आला. आलेल्या परिस्थितीवर मात करत प्रसंगी सायकल दुरुस्तीचं काम केलं. पण हिंमत हरली नाही. आपल्या नावाला जागत बहादूर अलीने शून्यातून व्यवसाय उभारला. २००० कोटींच्या वर कंपनीची उलाढाल नेत कुक्कुटपालन क्षेत्रातील भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून नावलौकीक मिळवला.
छत्तीसगड मधील राजनंदगाव. अवघी १६ लाख लोकसंख्या असलेला जिल्हा. याच ठिकाणी एका गरीब मुस्लीम कुटुंबात बहादूर अलीचा जन्म झाला. सर्व काही आलबेल आहे असं वाटत असतानाच बहादूर अलीच्या बाबांचा अकाली मृत्यू झाला. लहान वयातच बहादूर अलीवर कुटुंबाची जबाबदारी आली. मोठा भाऊ सुलतान अली घरचं सायकल दुरुस्त करण्याचं छोटंसं दुकान सांभाळत होता. बहादूर अली त्याला मदत करु लागला. सायकलचं पंक्चर काढ, सायकल दुरुस्त कर अशी कामे तो करु लागला. दोन्ही भावांचा स्वभाव मनमिळावू होता. कोणत्याही व्यक्तीशी सहज संवाद साधण्याची कला उपजतच त्यांच्यात आली होती. सायकलच्या दुकानाच्या निमित्ताने वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांचा संबंध येत असत. असंच एकदा दुकानात नेहमी येणाऱ्या डॉक्टरांसोबत चर्चा करत असताना डॉक्टरांनी अली बंधूना पोल्ट्री फार्मविषयी सांगितले. जास्त नाही तुम्ही १०० कोंबड्यांपासून सुरुवात करा असे डॉक्टरांनी सांगितले.
कोंबड्यांविषयी ‘क’ माहित नसताना देखील या व्यवसायात उतरण्याचे अली बंधूंनी निश्चित केले. १९८४ साली १०० कोंबड्या त्यांनी खरेदी केल्या. मात्र त्याचवेळी बहादूर अलीच्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कोंबड्या पाळणं वेगळं आणि त्या विकणं वेगळं. १०० कोंबड्या विकताना त्यांचा अक्षरश: घाम निघाला होता. मात्र त्यामुळे मार्केटींगचं ज्ञान मिळालं होतं. आपल्याला विपणन अर्थात मार्केटींगवर जास्त मेहनत घ्यावी लागणार हे लक्षात आल्यानंतर बहादूर अलीने मार्केटींगवर लक्ष्य केंद्रीत केलं. परिणामी इंडिया ब्रॉयलर ग्रुप (http://www.ibgroup.co.in/) अर्थात आयबी या अली बंधूंच्या कंपनीची उलाढाल १९९६ पर्यंत ५ कोटींवर पोहोचली.
मात्र ‘पिक्चर अभी बाकी है दोस्तो’, ५ कोटींची उलाढाल असून सुद्धा बहादूर अली आपल्या व्यवसायामध्ये समाधानी नव्हते. दरम्यान व्यवसायात मदत करण्यासाठी बहादूर अलींचा मुलगा झिशान आणि सुलतान अलींचा मुलगा फहीम देखील सोबत आले होते. याचवेळी दिल्लीच्या प्रगती मैदानात वर्ल्ड पोल्ट्री कॉंग्रेस नावाची कुक्कुटपालन क्षेत्रातील जागतिक प्रदर्शन भरले होते. हे प्रदर्शन अली बंधूंचा व्यवसाय आणि कलाटणी देणारे ठरले. इंग्रजी भाषेचा गंध नसताना बहादूर अली प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉलला भेट देत होते. त्यांची मुले आणि मेव्हणा संवाद साधण्यासाठी बहादूर अलींना मदत करत होते. तिथे त्यांची भेट अमेरिकन सल्लागाराशी झाली. भाषेची अडचण असताना देखील उत्सुकतेने अली ज्यापद्धतीने प्रश्न विचारत होते त्याने तो अमेरिकन सल्लागार भारावून गेला. त्याने तांत्रिक बाजू समजावल्याच पण व्यवसायातील काही बारकावे पण सांगितले.
१९९९ मध्ये त्यांनी पहिले कुक्कुट खाद्य प्रकल्प सुरु केला. त्यानंतर २००६ मध्ये सॉल्व्हन्ट एक्सट्रॅक्शन प्रकल्प देखील सुरु केला. २००७ मध्ये ऑईल रिफायनरी तर २००* मध्ये फीड प्लांट सुरु केला. २०१० मध्ये त्यांनी ड्रूल्स नावाचे प्राण्यांसाठी प्रोटीन पुरविणारे ब्रॅण्ड तयार केले.
आज अलींच्या आयबी ग्रुप कुक्कुटपालनाची क्षमता ५० लाखांपेक्षा अधिक आहे. पॅकेज्ड दूध, खाद्य तेल, माशांचे खाद्य सारखे उत्पादन देखील ते तयार करतात. त्यांचा व्यवसाय छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भ आदी परिसरांत पसरलेला आहे. आयबी ग्रुपमध्ये सध्या ८ हजारांपेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि दरवर्षी यामध्ये १० टक्क्यांनी वाढच होत असते. या कर्मचाऱ्यांपैकी ९० टक्के कर्मचारी ग्रामीण भागातील असतात. सध्या आयबी ग्रुपची उलाढाल २२०० कोटी रुपये इतकी आहे. दरवर्षी यामध्ये ३० टक्क्यांनी वाढ होत असते.. मेहनत, चिकाटी, मनमिळाऊ स्वभाव याच्यामुळेच ही वाढ झाली असे अली बंधू मानतात. २०१५ या वर्षासाठी आयबी ग्रुपला ‘एशियन पोल्ट्री ब्रिडींग पर्सनॅलिटी’ हा कुक्कुटपालन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळाला.
सायकलच्या दुकानापासून सुरुवात करुन कुक्कुटपालन क्षेत्रातील २२०० कोटींचे सुलतान बनणाऱ्या अली बंधूंच्या बहादूरीला सलाम.
- प्रमोद सावंत
सौजन्य : दै. मुंबई तरुण भारत, दि. ३०.०९.२०१६.
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages