धंद्यासाठी भांडवल कसे उभारायचे?

धंद्यासाठी भांडवल कसे उभारायचे?
व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैसा. तुमच्याकडे अजिबात भांडवल नसेल तर धंदा सुरु करण्याचे स्वप्न बघू नका. बियाण्याविना शेती होत नसते, तसेच पैशाविना धंदाही होत नाही. बीजभांडवल हे बहुधा वैयक्तिक बचत, कुटूंबियांनी पुरवलेला निधी, नोकरी करुन साठलेली शिल्लक यातून उभारले जाते. लक्षात ठेवा, धंद्याचा शुभारंभ कधीही उसने मागून आणलेल्या पैशातून किंवा कर्जाच्या पैशाने करु नका. त्यामागे एक श्रद्धा आहेच, परंतु चतुराईचा भाग जास्त आहे.
आम्ही शाळकरी वयात होळीची लाकडे जमवण्यासाठी एक युक्ती करायचो. गावातील कुणाचीही लाकडे लंपास करायची नाहीत, असा घरातल्यांचा दंडक होता त्यामुळे प्रत्येकजण स्वतःच्या घरातून एक लाकूड घेऊन येई. मग ती मोळी आम्ही सगळ्या घरांपुढे मिरवत न्यायचो आणि मोठ्या नम्रतेने घरमालकाला सांगत असू, की इतरांप्रमाणे तुम्हीही होळीला एखादे लाकूड द्या. प्रत्येकाला वाटायचे, की शेजाऱ्याने लाकूड दिलंय तर आपणही द्यावे. अशा रीतीने आमचा हेतू साध्य व्हायचा.
व्यवसायातही अशीच युक्ती कामी येते. आधी आपले पैसे गुंतवून धंदा सुरु करावा. नवउद्योगांसाठी सरकारच्या अनेक प्रोत्साहनपर योजना, सवलती असतात. त्यांचा लाभ उठवावा. विक्री व आवक सुरु झाली, की त्याचे रेकॉर्ड आणि याआधी कोणतेही कर्ज घेतलेले नाही, असे दाखवून बँका किंवा प्रमाणित वित्तसंस्थांकडून बिनधास्त कर्ज उचलायचे. मात्र त्याच्या परतफेडीची शिस्त काटेकोर पाळायची. कारण यात चालढकल झाल्यास नवे कर्ज मागताना अडचण येऊ शकते. नफा मिळू लागतो तसे तुम्ही गुंतवलेले पदरचे भांडवल मोकळे होत जाते. पुढचा सगळा खेळ गंगाजळी आणि नवी कर्जे यावर चालतो.
आपण कष्टाचा पैसा धंद्यात गुंतवतो तेव्हा त्याचे नेहमी दोन हिस्से करुन ठेवावेत. पहिला बीजभांडवल म्हणून आणि दुसरा आणीबाणीच्या प्रसंगी संकटातून सुटण्यासाठी राखून ठेवावा. आम्ही दुकान सुरु केले तेव्हा आमच्याकडून एक चूक घडली. वडिलांची नोकरीतील सर्व पुंजी दुकानाची जागा आणि मालखरेदी यात संपली. संभाव्य जोखीम आम्ही गृहित धरली नाही किंवा त्यासाठी राखीव तरतूद ठेवली नाही. परिणामी पहिल्याच वर्षी जबरदस्त नुकसान झाले तेव्हा आम्हाला आईचे मंगळसूत्रासहित सर्व दागिने विकून भरपाई करावी लागली.
नवा धंदा १००० दिवस चालवला तर पुढे आपोआप चालतो, हा ठोकताळा लक्षात घेऊन पहिली तीन वर्षे अंथरुण पाहून पाय पसरावेत. विक्रीतून मिळणारा पैसा चैनबाजीत उधळू नये. कोणताही व्यवहार नफा मिळत असेल तरच करावा. एकदा तोंडघशी पडल्यावर पुढे मी नफ्याबाबत नेहमी जागरुक राहिलो. खरेदी करताना कायम घासाघीस करुन माल कमी भावात पदरात पाडून घेतला. कर्जाबाबत मी सुरवातीला संकोची होतो, परंतु कर्ज घेऊन धंदा वाढवण्याचे महत्त्व मला बँकांनीच शिकवले. त्यामुळेच कर्ज घेणे-वेळेत फेडणे, पैशाची गुंतवणूक-पुनर्गुंतवणूक हे या खेळातील कौशल्य शिकून मी एका दुकानाची ३३ दुकाने केली. ‘दिमाग मेरा, पैसा तेरा,’ हे सूत्र मी माझ्या भाषणातून सांगतो. त्यामागे हीच व्यूहरचना आहे.
कर्ज घेताना दोन खबरदाऱ्या जरुर घ्या. अव्वाच्या सव्वा व्याजदर आकारणाऱ्या खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकू नका आणि कर्जाची रक्कम व्यवसायाखेरीज अन्य कारणांसाठी वापरु नका. ‘पैसा पैशाला आकर्षित करतो’ (मनी ॲट्रॅक्ट्स मनी) या म्हणीचे महत्त्व ओळखा.
Thanks Dr.Dhananjay Datar

Post a Comment

0 Comments