बदलांनी विचलित होऊ नका, व्यवसायाकडे लक्ष द्या

बदलांनी विचलित होऊ नका, व्यवसायाकडे लक्ष द्या

मुंबई : कंपनीच्या सर्वोच्च पातळीवरील नेतृत्वात झालेल्या बदलांनी विचलित होऊ नका, आपल्या व्यवसायाकडे, तसेच बाजारातील नेतृत्वाकडे लक्ष द्या, असे आवाहन टाटा सन्सचे नवे चेअरमन रतन टाटा यांनी मंगळवारी केले. आपली चेअरमनपदी झालेली निवड हंगामी स्वरूपाची आहे, नवा चेअरमन लवकरच शोधला जाईल, असेही टाटा यांनी सांगितले.

सायरस मिस्त्री यांची हकालपट्टी केल्यानंतर, रतन टाटा यांनी काल टाटा सन्सच्या सूत्रे हाती घेतली होती. त्यानंतर, आज त्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. टाटाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाउसमध्ये झालेली ही बैठक तीन तास चालली. उद्योग समूहाच्या वतीने अधिकृत निवेदन जारी करून, नंतर रतन टाटा यांच्या भाषणाचा तपशील माध्यमांना देण्यात आला.

नेमले दोन नवे संचालक

टाटा सन्सवर मंगळवारी राल्फ स्पेथ आणि एन. चंद्रशेखरन यांची अतिरिक्त संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्पेथ या समुहातील जग्वार लॅण्ड रोव्हर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत तर चंद्रशेखरन टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या देशातील सर्वात मोठ्या आयटी सेवा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक आहेत. (प्रतिनिधी)

आपण सगळे मिळून समूहाची बांधणी करू या...

टाटा यांनी सांगितले की, समूहाच्या कंपन्यांनी बाजारातील स्थान आणि स्पर्धा याकडे लक्ष द्यावे. आपल्या भूतकाळाशी तुलना करू नये. अनुयायीत्व पत्करण्यापेक्षा नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न करा. आम्ही आढावा घेऊ. गरजेनुसार निर्णय

घेतले जातील. बदल झाल्यास तुमच्याशी चर्चा केली जाईल.

मी तुमच्यासोबत काम करण्याबाबत आशावादी आहे. कारण भूतकाळात मी तुमच्यासोबत काम केलेले आहे. संस्थेने नेहमीच नेतृत्व करणाऱ्यांवर मात करून पुढे गेले पाहिजे. मला तुमचा अभिमान वाटतो. आपण सगळे मिळून या समूहाची बांधणी करू या. बैठकीवेळी, बॉम्बे हाउसबाहेर माध्यमांच्या प्रतिनिधींनी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments