- ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, October 4, 2016

१६व्या वर्षीच कुटुंबातल्या भीषण आर्थिक अडचणींमुळे तिला लग्न करावं लागलं,
१८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली,
१९८६ ते १९८९ ही तीन वर्षे तीने ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं,
नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं,
अतोनात बिकट परिस्थितीतसुद्धा अपरिमित कष्टांची परिसीमा करून तिने शिक्षण पूर्ण केलं,
आणि प्रगतीचा ध्यास घेत यशाची शिखरं पादाक्रांत करत करत आज ही भारतीय ‘दुर्गा’ अमेरिकेतल्या ‘कि सॉफ्टवेअर सोल्युशन्स’ची सीईओ आहे....
आज भेटूया आपल्या भारतातल्या या अजून एका दुर्गेला...ज्योथी रेड्डी’ला

प्रचंड इच्छाशक्ती, असामान्य आत्मविश्वास आणि जबरदस्त कार्यशक्ती असलेल्या माणसाने ठरवले तर काहीही अशक्य नसते हे ज्योथी रेड्डीने तिच्या चिकाटी, कठोर परिश्रम आणि असामान्य कर्तुत्वाने साऱ्या जगाला दाखवून दिले.

ज्योथीचे स्वप्न आहे की भारतातल्या प्रत्येक अनाथ मुलाची स्वतःची अशी एक स्वतंत्र ओळख असावी, त्यांना समान संधी मिळावी आणि ग्रामीण भागातील प्रत्येकाला व्यवसायाची संधी मिळावी.

ज्योथीचा जन्म विशाखापट्टणम येथील वारंगम गावात १९७० साली झाला. पाच बहिणींमध्ये ज्योथी सगळ्यात लहान. घराची परिस्थिती अतिशय गरीब आणि हलाखीची आणि म्हणूनच ज्योथीची रवानगी अनाथ आश्रमात झाली.

लहान वयातच जीवनाने तिला नानाविविध धडे द्यायला सुरुवात केली होती. अनाथआश्रमात सुख-दुःख वाटायला तिला कोणी सवंगडी नव्हते पण ह्या गोष्टीकडे फार लक्ष न देता, खंत न मानता ज्योथीने शिक्षणात पुरेपूर लक्ष घातले.

अनाथ आश्रमात राहून सरकारी शाळेत ज्योथीचं शिक्षण सुरु झालं. सुट्टीच्या काळात ज्योथी सुपेरिटेंडेंटच्या घरी घरकाम करत करत काही छोटे मोठे कोर्स पण करायची. लहाणपणीच तिला एक गोष्ट नक्की लक्षात आली की ती शिकली आणि चांगली नोकरी मिळाली तर आणि तरच तिचे आयुष्य बदलू शकेल.

माणूस ठरवतो आणि नशीब उधळून लावतं असं नेहेमीच वाढून ठेवलेलं ताट ज्योथीच्या बाबतीत सुद्धा सामोर आलं.

दूरच्या चुलत भावाशी तिचं लग्न लावून देण्यात आलं. १६ व्या वर्षी लग्न झाल्यावर २ वर्षांतच ज्योती दोन मुलांची आई सुद्धा झाली.

आता परिस्थिती खूपच बिकट झाली. चरितार्थ चालवण्यासाठी शेतावर ५ रुपये रोजचे अशाप्रकारे ज्योथी काम करू लागली. नोकरी उच्च शिक्षण आणि त्यातून पुढे मिळू शकणारं चांगल जीवन ही सगळीच स्वप्न भंगून गेली.

त्याच काळात ‘नेहरू युवा केंद्रा’कडून एक संधी चालून आली.
केंद्र सरकार तर्फे तरुणांसाठी चालवण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार करण्याचे काम ज्योथीला मिळालं. पण त्यातून मिळणारं मानधन तिच्या दोन मुलांच्या प्राथमिक गरज देखील पूर्ण करू शकत नव्हतं. आणि आता म्हणून महिन्याचं उत्पन्न वाढविण्यासाठी ती दिवसा बाकीचं काम आणि रात्री पेटीकोट शिवायला लागली.

हे करत असतानाच ज्योथीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटीतुन कला शाखेतलं शिक्षण पूर्ण केलं. यासोबतच ती टायपिंग सुद्धा शिकली. खरतरं हे अजिबातच सोपं नव्हतं कारण पैश्यांची चणचण तर होतीच पण घरी लक्ष देताना ओढाताण होत असल्याने जवळच्या नातेवाईकांचा भयंकर त्रास सुद्धा तिला सहन करावा लागत होता.

१९९४ मध्ये ज्योथी बी.ए. झाली आणि १९९७ मध्ये पदव्युत्तर शिक्षण काकतीय युनिव्हर्सिटी मधून घेतल्यानंतर ज्योथीला एका शाळेत ३९८ रुपयाच्या पगाराची विशेष  शिक्षकाची नोकरी मिळाली.

ह्या नोकरीसाठी रोज ज्योथीला दोन तासांचा प्रवास करावा लागत असे आणि येण्याजाण्यात तिचा बराचसा पगार सुद्धा खर्च व्हायचा. म्हणून आता यावर तोडगा म्हणून कल्पक आणि कष्टाळू ज्योथीने प्रवासात साड्या विकायला सुरुवात केली.

तिच्या या सगळ्या एकांड्या संघर्षात ज्योथी एक फार महत्वाची गोष्ट शिकली आणि ती  म्हणजे (Time management ) वेळेचा सदुपयोग.

शिक्षकाची नोकरी आणि साड्यांची विक्री यातून ज्योथी आता पुरेसे कमावत होती पण 'अजून चांगल आयुष्य' ही तिची भूक मात्र ज्योतीला शांत बसू देत नव्हती.

आणि यातच तिच्या एका नातेवाईकाला अमेरिकेहून भेटायला आलेल्या एका दूरच्या नातेवाईकाला पाहून ज्योतीलाही अमेरिकेला जायचे ध्यास लागले.

नव्या स्वप्नांनी पछाडलेल्या ज्योथीने आता कॉम्पुटर कोर्स केला आणि तो दिवस उजाडला.
नवरा आणि समाजाच्या विरोधाला न जुमानता, आपल्या दोन्ही मुली मिशनरी -हॉस्टेल मध्ये ठेवून त्यांची नीट व्यवस्था लावून ज्योथी अमेरिकेला रवाना  झाली.

अमेरिकेत जम बसवणे इतके सोपे आहे का?

पण कामाच्या बाबतीत वाघीण असणाऱ्या ज्योतीला ‘पण’ या शब्दांनी आणि या शब्दामुळे जन्म घेणाऱ्या प्रश्नांनी कधीच छळलं नाही.

स्वतःचा खर्च भागवण्यासाठी तिने गॅस स्टेशन (पेट्रोल पम्प ) वर काम करायला सुरुवात केली.
बेबी सिटींग, हमाली अशी काम सुद्धा ज्योथीने तिथे कुठलीही तमा न बाळगता केली. विडिओ-पार्लर मध्ये काम केलं.  एका गुजराथी परिवाराकडे पेइंग गेस्ट म्हणून राहत असताना नातेवाईकांच्या मदतीने तिला एका कंपनीत काम मिळालं आणि नंतर अश्याच दुसऱ्या एका कंपनीत तिला सॉफ्टवेअर रिक्रुटरचा जॉब मिळाला.

इंग्रजी भाषा आणि उच्चार यांचा पहिल्यांदा जरासा अडथळा होता पण त्यावर सुद्धा ज्योथीने कष्टाने अभ्यास करत करत मात केली.  

तिच्यातला उद्योजक जागा झाला.

मेक्सिकोला स्टॅम्पिंग’साठी गेली असता तिच्या मनात एक कल्पना आली,”आपण सुद्धा सहजच असाच एक उद्योग सुरु करू शकतो.” कारण ज्योथीला या संदर्भातल्या सगळ्या पेपरवर्कची व्यवस्थीत माहिती होती.

आता या नवीन ध्यासाने झपाटलेल्या ज्योथीने स्वतःजवळ असलेली सर्व बचत पणाला लावून आता तिने एक ऑफिस चालू केलं आणि आजही ज्योथी 'की सॉफ्टवेअर सोल्युशन्स' यशस्वीपणे चालवते आहे.

ज्योतीच्या दोन्ही मुली आता अमेरिकेत शिक्षण पूर्ण करून इंजिनीअर झाल्या आहेत आणि लग्न करून अमेरिकेतच स्थायिक झाल्या आहेत.

ज्योती आता भारतातल्या स्वतःच्या स्वप्नांवर काम करते आहे ज्यात ती युवकांना  ट्रैनिंग आणि नोकरीच्या संधी उपलध करून देते. ज्योतीला एक स्कूल सुरु करायचे आहे ज्यात गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना बालवाडी ते पदव्युत्तर पर्यंतचे सर्व शिक्षण घेता येईल.

ज्योथी अनेक सामाजिक संस्थांशी जोडले गेली आहे. स्वतःच्या अनाथालायातले दिवस लक्षात ठेवून मुद्दामून ठरवून सध्या अनेकानेक अनाथालयांची कायदेशीर सल्लागार म्हणून ज्योथी आत्ता काम पाहते आहे.

ज्योथी जेव्हा जेव्हा भारतात येते तेव्हा तेव्हा ती इथे अनेकानेक सेमिनार्स घेते आणि इथल्या युवकांना आणि विशेषतः स्त्रियांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी ती प्रोत्साहन देते .

ज्योथी म्हणते, " परिस्थिती काहीही असो महिलांनी शिकलंच पाहिजे, त्यांनी आर्थिकदृष्टा स्वतंत्र असलंच पाहिजे. महिला कदाचीत आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर एकतर वडिलांवर, नवऱ्यावर अथवा मुलावर अवलंबून असतात. पण, आता हे चित्र  बदललं पाहिजे, त्यांनी असे करण थांबवलं पाहिजे. हे त्यांच्यासाठी, समाजासाठी आणि पर्यायाने देशासाठी सुद्धा प्रगतीचे आणि ‘चांगल्या आयुष्यासाठीचे’ उत्तम द्योतक ठरेल."

स्वतःच्या उदाहरणावरून केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सुद्धा प्रत्येक स्त्रीला अविरत प्रेरणा देणाऱ्या ज्योथी रेड्डीच्या जिद्दीला आणि संघर्षाला Team Bharatiyans’चा प्रणाम.

  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages