Amezon

जवळपास ४,३६७ अब्ज रुपये इतकी त्याची संपत्ती. तो रोज जवळपास २२ कोटी रुपये कमावतो...

तो ऑनलाइन सगळं विकतो. पुस्तकापासून चुलीतल्या गोवऱ्यांपर्यंत. जगातला तिसऱ्या क्रमांकाचा धनाढ्य म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. जवळपास ४,३६७ अब्ज रुपये इतकी त्याची संपत्ती. तो रोज जवळपास २२ कोटी रुपये कमावतो. त्यानं घसघशीत पगाराची आरामदायी नोकरी सोडून अॅमेझॉन हे ऑनलाइन विक्री करणारं संकेतस्थळ काढलं, तेव्हा त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला वेड्यात काढलं. या वेडानंच त्याला कुठल्या कुठं नेलं. जेफ बेजोस त्याचं नाव. आरक्षण, बेरोजगारी, कालबाह्य शिक्षणाच्या गर्तेत अडकलेल्या युवकांसाठी त्याची ही चित्तरकथा नक्कीच प्रेरणादायी.

जैकी कुमारवयात असतानाच तिच्या पोटी जेफचा जन्म झाला. साल १९६४. तारीख १२ जानेवारी. जन्मस्थळ अल्बुकर्क, न्यू मेक्सिको. जैकीचं जेफच्या वडिलांसोबतच लग्न उणंपुरं दोन वर्षही टिकलं नाही. जेफ १८ महिन्यांचा असताना, त्यांना सोडून त्याचे वडील निघून गेले. साहजिकच जैकीनं पुन्हा दुसरं लग्न केलं. त्यामुळं जेफच्या वाट्याला बालपणापासून वडिलांचा सावत्रपणाच आला. जैकीच्या लग्नानंतर हे कुटुंब ह्युस्टन, टेक्सासला स्थलांतरित झालं. जेफ अगदी लहान असतानाची गोष्ट. दंतकथा वाटावी अशी. आई त्याला ज्या पाळण्यात मोठ्या लाडानं झोपवायची, त्या पाळण्याचे पाय स्क्रू ड्रायव्हरनं काढायची करामत या पठ्ठ्यानं केली. अन् इथूनच त्याचे पाळण्यातले पाय खऱ्या अर्थानं दिसले.
जेफचे आजोबा अल्बुकर्कमध्ये अणू ऊर्जा विभागाचे प्रादेशिक अधिकारी होते. त्यांना गुराढोरांचं, प्राण्यांचं भयानक वेड. त्यांनी त्यापायी निवृत्तीपूर्वीच काहीकाळ नोकरी सोडली. आपल्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पंचवीस हजार एकर जमिनीवर एक भलंमोठं पशू संग्रहालय उभारलं. जेफ आपल्या आजोबांसोबत ग्रीष्मातल्या सुट्या घालविण्यासाठी येथे यायचा. त्याचं मन इथल्या प्रसन्न वातावरणात चांगलंच रमायचं. त्याला लहानपणापासूनच यंत्र आणि विज्ञानाचं प्रचंड वेड. त्याच्या आई-वडिलांचं एक गॅरेज होतं. या गॅरेजची त्यानं अक्षरशः प्रयोगशाळा केली. इथं ना-ना प्रयोग करण्यासाठी त्याला एकांतवास हवा असायचा. त्याची भावंडं त्याचा पिच्छा सोडायची नाहीत. मग त्यांच्यापासून वाचण्यासाठी त्यानं आपल्या खोलीत एक अलार्म तयार केला. तो कुणालाही दिसणार नाही, अशा जागी ठेवला. कोणी येतंय असं कळालं, की घंटा वाजायची. जेफ आपल्या प्रयोगाचा सारा पसारा गुंडाळून धूम ठोकायचा. शालेय जीवनात त्याची गणना हुश्शार मुलात व्हायची. त्यानं प्रिस्टन विद्यापीठात भौतिकशास्त्राच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला. मात्र, ते प्रयोग आणि शिक्षणात त्याचं मन रमलं नाही. साहजिकच त्यानं आपला मोर्चा इलेक्ट्रिकल इंजिनीअर आणि कम्प्युटर विज्ञानाकडे वळवला. या विषयात त्यानं विशेष प्राविण्यासह पदवी मिळवली. त्याला नंतर कार्नेगी मेलॉन विद्यापीठानं डॉक्टरेट देऊन गौरवही केला. जेफनं पदवी मिळवल्यानंतर काही काळ वॉल स्ट्रीटमध्ये कम्प्युटर विज्ञान क्षेत्रात काम केलं. नंतर फिटेल कंपनीत आतंरराष्ट्रीय व्यापारासाठी नेटवर्क निर्मितीचं काम त्याच्याकडं होतं. यानंतर कम्प्युटर क्षेत्रात अगदी नावाजलेल्या ई शॉ कंपनीत काम करण्याचा योग त्याला आला. या कंपनीत त्याला व्हाइस चेअरमन बनविण्यात आलं. झालं इथूनंच जेफच्या मनानं उचल खाल्ली. कामात मन रमेनासं झालं. त्यातला तोच-तोचपणा नकोसा वाटायचा. ९४चं वर्ष. त्यानं पूर्ण अमेरिका प्रवास करून पालथी घातली. याच काळात त्याला आपल्या पुढं काय करायचंय हे सुचलं. या प्रवासात जे सुचलं ते कागदावर उतरवून काढलं. त्यानं भविष्याचा वेध घेतला. येणारा काळ फक्त आपला असेल, याची जाणीव त्याला याच प्रवासात झाली. इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत चाललीय. येता काळ फक्त संगणक युगाचा असेल, विज्ञानाचा असेल याची चाहूल त्याला लागली. झालं. त्यानं इंटरनेटद्वारे विक्रीसेवा सुरू करण्याचा मनोदय पक्का केला. तो जिथं काम करतो त्या डी ई शॉ कंपनीच्या संचालकांना त्यानं हा निर्धार बोलून दाखवलं. त्यांनी जेफची तुलना मुर्खात केली. बिरबलाची खिचडी कधी शिजणार, कधी खाणार असंच त्यांना वाटलं. पण त्याला स्वतःच्या मनगटावर आणि कर्तृत्वावर दांडगा विश्वास. त्यापोटीच त्यानं नोकरीला लाथ मारली. वर्ष १९९५. तारीख ६ जुलै. जेफनं घरातल्या छोट्या गॅरेजमध्ये तीन कम्प्युटर सर्व्हर बसवले. इथूनच एका नव्या इतिहासाला सुरुवात झाली. त्यानं ऑनलाइन पुस्तक विकणारी साइट सुरू केली. फक्त दोन महिन्यात त्याच्या या धाडसी निर्णयानं तो योग्य असल्याचं दाखवून दिलं. या काळात आठवड्याला २० हजार डॉलर पुस्तकांची विक्री झाली. अन् त्यानं तेव्हापासून मागे असं पाहिलंच नाही. अनेक उपनद्या पोटात घेऊन पुढे प्रवास करणारी महाकाय अॅमेझॉन नदी. तिचंच नाव त्यानं आपल्या वेबसाइटला दिलं. तो शेअरबाजारात उतरला. तेव्हा त्यानं गुंतवणूकदारांना आपल्या कंपनीत गुंतवणूक करू नका, असा अनाहूत सल्ला दिला. तुमची ७० टक्के रक्कम बुडित खात्यात जमा होईल, असं त्याचं म्हणणं होतं. त्याच्या आई-वडिलांनी आपली सर्व पुंजी, जवळपास दोन कोटींची रक्कम या शेअरमध्ये गुंतवली. दहा वर्षांत अॅमेझॉनमध्ये त्यांची सहा टक्के भागीदारी झाली अन् ते अब्जाधीश झाले. आजघडीला तो ऑनलाइन सर्व काही विकतो. बाजारापेक्षा कमी किमतीत, तुमच्या दारात. हाच त्याचा दावा.
तो अंतराळ उड्डाणासाठी नवं तंत्रज्ञानही बनवतोय. ‘ब्ल्यू होरायझन’ ही त्याची या क्षेत्रातली कंपनी. अमेरिकन बाजारात प्रचंड खळबळ माजवणारं ‘किंडल’ हे त्याचंच लाडकं अपत्य. आता ते भारतातही दाखल झालंय. त्याचा इथे वर्षाला म्हणे जवळपास दोनशे टक्के विकास होतोय. अमेरिकेत जेव्हा किंडल स्टोअर सुरू झालं, तेव्हा त्यात ऑनलाइन ४४ लाख पुस्तकं होती. भारतात सध्याच या स्टोअरमध्ये ३० लाखांपेक्षा जास्त पुस्तकं आहेत. सगळी दुनियाच अजब.
जेफ म्हणतो, ‘आळस धोकादायक असतो. आपलं काम तडाखेबंद करा. इतिहास घडवा. तुम्ही क्षणिक फायदा-तोट्याचा विचार न करता भविष्याचा विचार करा, तरच जीवनाबद्दल धाडसी निर्णय घ्याल. त्यावर तुम्हाला नंतर पश्चाताप करायची पाळी येणार नाही. मला वयाच्या ८० व्या वर्षी मी नोकरी सोडल्याचा पश्चाताप झाला नसता, पण मी ऑनलाइन बाजाराचा फायदा उठवला नसता, तर त्याचा पश्चाताप नक्कीच झाल असता. मी हे जाणून होतो की मी अपयशी ठरलो असतो, तर मला काही वाटले नसते. मात्र, मी प्रयत्नच केले नसते तर मला नक्कीच पश्चाताप झाला असता.’ त्यामुळंच जेफनं प्रयत्न केले. तो शिखरावर पोहचला. मग तुम्ही कधी करताय सुरुवात...?

Post a Comment

0 Comments