साखरेचे खाणार त्याला नरेंद्र देणार - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, November 30, 2016

साखरेचे खाणार त्याला नरेंद्र देणार

साखरेचे खाणार त्याला नरेंद्र देणार
-----------------------
सन २०००. कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील शिंन्दोगी भाग. भारतातील इतर भागांप्रमाणे शेतीबहुल भाग. बहुतांश सगळेच शेतकरी. दिवसभर शेतात राबून देखील पैसा मात्र कमीच. रायप्पा मल्लाप्पा कलटी हा या भागातील शेतकऱ्यांपैकी एक शेतकरी. ४० एकर जमीन. या ४० एकरावर रायप्पा मका लावायचा. सगळा खर्च जाऊन हाताशी यायचे फक्त १ लाख रुपये. या उत्पन्नातून तो कसाबसा शेतीची कामं आणि घर चालवायचा. हाती शिल्लक काहीच उरायचे नाही. म्हणण्यासाठी त्याच्याकडे एक दुचाकी होती. हीच काय त्याची श्रीमंती दर्शविणारी मालमत्ता. याच दरम्यान या परिसरात एक साखर कारखाना आला. रायप्पाने मक्याचं पीक बंद करुन ऊसाचं पीक घ्यायला सुरुवात केली. तो ऊस थेट कारखान्याला विकू लागला. विकल्यानंतर १५ दिवसांच्या आत रायप्पाला पैसे मिळू लागले. आज रायप्पाला वर्षाला २० ते ३० लाख रुपये निव्वळ नफा होतो. आज त्याच्याकडे १०० एकर जमीन आहे. आता रायप्पा दुचाकीवरुन नव्हे तर टाटा इंडिकामधून प्रवास करतो. ही सारी किमया घडली श्री रेणुका साखर कारखान्यामुळे.
श्री रेणुका साखर कारखान्याने कमी वेळेत एवढी प्रगती करण्यामागचं कारण म्हणजे या कारखान्याच्या संस्थापिका विद्या मुरकुंबी आणि त्यांचे चिरंजीव नरेंद्र मुरकुंबी होत. मुरकुंबी कुटुंबीय मूळचे बेळगावचे. नरेंद्रचे बाबा, मधुसूदन मुरकुंबी टाटा टी आणि टाटा केमिकल्सचे बेळगावातील वितरक होते. बाबांसोबत नरेंद्र भारतातील अनेक राज्यांत गेला. आसाम मधील चहाचे मळे तसेच पंजाबमधील गव्हाची शेती त्याने पाहिली. शेतीविषयी एक वेगळीच त्यामुळे ओढ निर्माण झालेली. बेळगावच्या गोगटे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधून त्याने इलेक्ट्रॉनिक्स एण्ड कम्युनिकेशन मध्ये अभियांत्रिकीची पदवी मिळविली. तसेच उद्योजकता आणि न्यू व्हेंचर मॅनेजमेंट हा विषय घेऊन त्याने १९९४ साली आयआयएम- अहमदाबाद मधून व्यवस्थापनाची पदव्युत्तर पदविका संपादन केली. पण त्याचा कल शेतीकडे होता. शेतीसंबंधित त्याला व्यवसाय करायचा होता. वरकरणी त्याने जैविक किटकनाशकांचा व्यवसाय सुरु केला. मात्र लवकरच त्याने आपला कल साखरेकडे वळविला.
सरकारने साखर उद्योगाला उत्तेजन देण्यासाठी साखर कारखान्यासंबंधी नियम शिथील केले. सबसिडी जाहीर केली. हीच सुवर्णसंधी साधून साखर कारखाना सुरु करण्याचे नरेंद्राने ठरविले. त्यासाठी बेळगावची निवड केली. हीच जागा निवडण्याची अनेक कारणे होती. एकतर बेळगावला उत्तम प्रतीचा आणि मुबलक प्रमाणात ऊस तयार होतो. प्रचंड प्रमाणात तयार होणारा हा ऊस विकण्यासाठी मात्र शेतकऱ्याला ६०-७० किलोमीटर दूर जावे लागे. इतकं दूर जाऊन देखील पैसे वेळेवर मिळत नसत हे दुखणं वेगळंच.
हीच दुखरी नस नरेंद्राने हेरली. याच परिसरात साखर कारखाना सुरु करण्याचे ठरविले. याचदरम्यान आंध्र प्रदेश सरकारने एका साखर कारखान्याचे युनिट विकण्याचे निश्चित केले. ५५ कोटी रुपये एवढे त्याचे मूल्य होते. एवढे पैसे नरेंद्राकडे नव्हते. शेतकऱ्यांमधूनच भांडवल उभे करण्याचे नरेंद्राने ठरविले. शेतकऱ्यांनी समभागधारक व्हावे यासाठी प्रयत्न केले. १० रुपये मूल्य असलेले किमान ५०० समभाग शेतकऱ्याने खरेदी करण्याची अट करण्यात आली. सुरुवातीला शेतकऱ्यांनी विरोध केला. मात्र कारखाना सुरु झाल्यानंतर जीवनमान बदलेल हे पटल्यानंतर शेतकऱ्यांचा विचार बदलला. तब्बल ९ हजार ९०० शेतकरी कारखान्याचे समभागधारक झाले. त्यांचे भागधारक मूल्य ३५० कोटी रुपये एवढे झाले. श्री रेणुका साखर कारखाना उभा राहिला.
आज या साखर कारखान्यात दिवसाला २००० टन इतक्या ऊसाचे गाळप होते. भारतातील सर्वांधिक गाळप होणाऱ्या आकड्यांपैकी हे एक आहे. २००५ मध्ये श्री रेणुका साखर कारखान्याची नोंद शेअर बाजारात झाली. २००६ मध्ये पुढील आव्हानासाठी नरेंद्र मुरकुंबी सज्ज झाले. हे आव्हान होतं जगातील सर्वांत मोठ्या साखर बाजारपेठ असलेल्या ब्राझील देशात शिरकाव करण्याचे. व्हाले दो इव्हाई आणि अन्य एक असे दोन साखर कारखाने रेणुकाने विकत घेतले. भारतातील ४० हजार कोटी प्रति दिन असं ऊसाची गाळप क्षमता असताना ब्राझील मध्ये मात्र दिवसाला ७० हजार कोटी प्रति दिन गाळप करण्याची क्षमता या कारखान्याने मिळविली. आज नरेंद्र मुरकुंबींचे संपत्ती मूल्य अंदाजे ३५०० कोटी रुपये एवढे आहे.
एकीकडे साखर कारखाने बंद होत असताना, जुना साखर कारखाना विकत घेऊन त्याला व्यावसायिक पद्धतीने चालवून दाखविण्याची नरेंद्र मुरकुंबीची कामगिरी निश्चितच कौतुकास्पद आहे. म्हणतात ना साखरेचे खाणार त्याला देव देणार.
-  प्रमोद सावंत
-------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages