एक टांगेवाला अब्जाधीश कसा बनला ? ------------------------------------------

एक टांगेवाला अब्जाधीश कसा  बनला ?
------------------------------------------

मसाल्यांचा राजा- एमडीएच मसाला
टीव्ही वर जाहिरात पाहताना आपल्याला एक पांढऱ्या मिशातील आजोबा दिसतात. अगदी यांच्याकडे पाहूनच चाचा चौधरी हे पात्र तयार केलं असावं असं वाटतं. जाहिरात विश्वातील सर्वांत वयोवृद्ध असे ते मॉडेल आहेत. आज त्यांचं वय ९३ वर्षे आहे. तरिही मानसिक आणि शारिरीक दृष्ट्या ते सक्षम आहेत. ६० वर्षांपूर्वी अवघ्य़ा १५०० रुपयांत त्यांनी आपला व्यवसाय सुरु केला. आज हा व्यवसाय आपण एमडीएच मसाले नावाने ओळखतो. भारतात असा एकही व्यक्ती नसावा ज्याला एमडीएच मसाले हे नाव वा एमडीएच मसालेच्या जाहिरातीतील ते आजोबा आठवत नसतील. या आजोबांचं नाव आहे महाशय धरमपाल गुलाटी. महाशियां दी हट्टी हा या एमडीएचचा फुलफॉर्म.

१९१९ साली महाशय चुन्नीलाल गुलाटी यांनी पाकिस्तानातील सियालकोट मध्ये महाशियां दी हट्टी नावाचं मसाल्याचं दुकान सुरु केलं. २७ मार्च १९२३ साली महाशय गुलाटी आणि माता चनन देवी यांच्या पोटी धरमपालने जन्म घेतला. हे दाम्पत्य धार्मिक, परोपकारी स्वभावाचे होते. आर्य समाजाचे अनुयायी होते. धरमपाल शिक्षणात एवढा हुशार नव्हता. १९३३ साली ५ वीतूनच त्याने शिक्षणाला राम राम केला. १९३७ साली वडलांच्या मदतीने छोटा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर साबणाचा व्यवसाय व काही काळाने नोकरी देखील केली. त्यानंतर कापडाचा व तांदळाचा व्यवसाय देखील केला. मात्र हवा तसा जम बसत नव्हता. शेवटी कंटाळून वडलांचाच मसाल्याचा व्यवसाय करण्याचा विचार केला. ‘देग्गी मिर्च’ नावाने हा मसाल्याचा व्यापार अखंड भारतात प्रसिद्ध होता.

१९४७ साली भारताची फाळणी झाली. फाळणीच्या करारात ठरल्याप्रमाणे पाकिस्तानातील हिंदूंना भारतात यावे लागले. धरमपालचं कुटुंब देखील सगळा व्यापार, घर-दार मागे सोडून भारतात आले. ७ सप्टेंबर १९४७ साली ते अमृतसरच्या रिफ्युजी कॅम्प मध्ये आले. २७ सप्टेंबर १९४७ ला धरमपाल मेव्हण्यासोबत दिल्लीला आला. धरमपाल त्यावेळी २३ वर्षांचा होता. करोलबाग मध्ये ते एका नातेवाईकाच्या घरी राहू लागले. वीज नाही, पाणी नाही आणि शौचालयाची सुविधा देखील नाही अशी अवस्था त्या घराची होती. धरमपालच्या वडलांकडे १५०० रुपये होते. त्यांनी धरमपाल काहीतरी व्यवसाय करायला १५०० रुपये दिले. धरमपालने त्यातील ६५० रुपये खर्चून एक टांगा खरेदी केला. नवी दिल्ली स्टेशन ते कुतुबरोड आणि करोल बाग ते बडा हिंदू राव परिसरात तो दोन आण्यात टांगा चालवी. कसंबसं घर चालत होतं. मात्र एक दिवस असा उजाडला की त्यादिवशी कोणीच प्रवासी भेटला नाही. संपूर्ण दिवस उपाशी रहावं लागलं. मिसरुड फुटलेल्या या पोराची लोकांनी टिंगल उडवली. टांगा चालवणं हे आपलं काम नाही. आपल्या रक्तात व्यवसाय आहे. व्यवसायात आपण जास्त कमवू शकतो, हे धरमपालला उमजलं. त्याने टांगा विकला. आलेल्या पैशातून अजमल खान रोडला त्याने मसाल्याचा व्यापार सुरु केला.

या छोट्याशा दुकानात मसाले कुटून परिसरात तो विकू लागला. हळूहळू धंद्याचा जम बसला आणि पोटापाण्याचा प्रश्न सुटला. ‘सियालकोटचे मसाला उत्पादक’ अशी पंचक्रोशीत प्रतिमा निर्माण झाली. १९५३ साली त्याने चांदनी चौकात जरासं मोठं दुकान भाड्याने घेतलं. त्यानंतर १९५९ साली किर्ती नगर परिसरात जमिन खरेदी करुन मसाला तयार करण्याचा कारखाना सुरु केला. ‘महाशियां दी हट्टी’ म्हणजेच एमडीएच हा ब्रॅण्ड अल्पावधीत नावारुपास आला.

आज एमडीएच मसाले अत्याधुनिक यंत्राने तयार केले जातात. फक्त भारतातच नव्हे तर विदेशात देखील एमडीएच मसाल्याची ख्याती आहे. १००० च्या वर पुरवठादार आणि ४ लाख घाऊक विक्रेते एवढं मोठं जाळं एमडीएचने विस्तारलेलं आहे. अमेरिका, कॅनडा, जपान, संयुक्त अरब अमिरात, इंग्लंड, युरोप, दक्षिण पूर्व आशिया, सौदी अरेबिया आदी देशांत ६२ हून अधिक उत्पादनांची विक्री होते. अवघ्या १५०० रुपयांत सुरु झालेला हा व्यवसाय आज कोट्यांची उलाढाल करतोय. महाशय धरमपाल गुलाटी यांचा मुलगा राजीव गुलाटी हे आता व्यवसायाचा हा पसारा समर्थपणे पुढे नेत आहेत.

आर्यसमाजाचे अनुयायी असणाऱ्या आपल्या आईवडलांचा परोपकाराचा आदर्श धरमपाल पुढे चालवत आहेत. १९७५ साली दिल्लीला आर्यसमाजात त्यांनी १० खाटांचं इस्पितळ सुरु केलं. १९८४ साली आई चनन देवीच्या नावे २० खाटांचं जनकपुरीत इस्पितळ उभारलं. पुढे हे इस्पितळ विकसित होऊन ५ एकर जागेत ३०० खाटांमध्ये स्थिरावलं. जगातील उत्तमोत्तम सेवा या इस्पितळात पुरवली जाते. त्याचप्रमाणे ५ वी तून शिक्षण सोडलेल्या धरमपालांनी एमडीएच इंटरनॅशनल स्कूल, महाशय चुन्नीलाल सरस्वती शिशु मंदिर, माता लीलावती कन्या विद्यालय, महाशय धरमपाल विद्या मंदिर सारख्या २० पेक्षा जास्त शाळा उभारल्या आहेत. कितीतरी गरीब मुलांच्या शैक्षणिक शुल्कापासून आवश्यक वस्तूंचा खर्च धरमपाल स्वत: करतात. इतकंच नव्हे तर अनेक गरीब मुलींच्या लग्नाचा खर्च देखील धरमपालांनी स्वत: केलेला आहे.

‘आपल्या जवळचं सर्वोत्तम जगाला द्या, हेच दिलेलं सर्वोत्तम तुमच्याकडे आपोआप येईल’. इतकं साधं सरळ जीवनाचं सूत्र सांगणारा हा कर्मयोगी ग्रेटच म्हणावा लागेल.

- प्रमोद सावंत
सौजन्य : दै. मुंबई तरुण भारत, शुक्रवार, २५ नोव्हें. २०१६.

------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Post a Comment

0 Comments