फोर इडियट्स , भन्नाट उद्योजक मित्र

फोर इडियट्स , भन्नाट उद्योजक मित्र
------------------------------------------

रुपेश शेनॉय आणि विनायक पालनकर हे दोन तरुण २०११ मध्ये प्रथम एकमेकांना भेटले. शाळांसाठी इआरपी सोल्युशन तयार करणाऱ्या ‘वॅगसन्स’ या स्टार्ट अपसाठी ते हैद्राबादच्या शाळाशाळांमधून फिरले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांचे काम शिक्षणाच्या मुख्य समस्येला भिडणारे नाही.  पुढे आयएसबीमध्ये एमबीए करणाऱ्या अभिषेकला विनायकने,  तर २०१३च्या उत्तरार्धात अमेझॉनचा माजी कोड गुरु दीप शहा याला रूपेशने आपल्या मोहिमेत सामील करून घेतले. सुरुवातीला त्यांनी मार्केटमधील विविध खेळांचे विश्लेषण करायला सुरुवात केली. त्यांच्या मते आजची जगभरातील शिक्षणपध्दती अनेक प्रकारे विस्कळीत अशी आहे. त्यांच्या मते विषयाचा योग्य आशय कोणता, तो कसा मिळणार  आणि  त्याचा स्रोत काय  याबद्दल शिक्षक, विद्यार्थी आणि पालक गोंधळलेले आहेत. फक्त परीक्षेच्या वेळीच विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होत असल्यानेत्यांच्या विषयातील कच्चेपणाची वेळीच दखल घेतली जात नाही. तसेच हल्लीपालकांकडे आपल्या पाल्यांसाठी पुरेसा वेळ नसतो.

खेळ आणि शैक्षणिक अनुभव यांचे सुयोग्य मिश्रण असेल तर यातूनच विद्यार्थी शिक्षणात गुंतून राहतील आणि शिकण्याला एक अर्थ प्राप्त होईल. शैक्षणिक अॅप हे त्याचवेळेस प्रभावी ठरू शकते जेव्हा त्यात संपूर्ण अभ्यासक्रम सामावलेला असेल. अभिषेक, रुपेश, दीप आणि विनायक या तरुणांच्या ‘माक्काजाई’ (www.Makkajai.com) या कंपनीने सध्या केजी ते पाचवीपर्यंतचे संपुर्ण गणित या विषयाचे अॅप विकसित केले असून त्यापाठोपाठ इतर विषयांचेही अॅप विकसित केले जाणार आहेत.

अभिषेक सांगतो, आम्ही प्रसिध्दीवर भर दिल्याने वर्षभरातच आमच्या अॅपचे दहा लाख डाऊनलोड झाले. पैसे देऊन अॅप न देता त्याच्या नैसर्गिक डाऊनलोडकडे आम्ही जास्त लक्ष दिले. २०१४ च्या नोव्हेंबरमध्ये त्यांच्या कंपनीने पहिला गेम ‘मॉनस्टर मॅथ’ बाजारात आणला.

‘मॉनस्टर मॅथ’ याचा उपयोग करुन मुलं गणितविषयक चाळीस कौशल्ये विकसित करु शकतात. मुलांना गोष्ट सांगितलेली आवडते. त्याचाच उपयोग ह्या अॅपमध्ये केलेला आहे व गोष्टींच्या माध्यमातून बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर, शिवाय मूळ संख्या इत्यादी संकल्पना विकसित केल्या जातात. तुमच्या मुलाची प्रगती किती झाली आहे ते कळवणारा ईमेलही यातून पाठवला जातो. त्याचा दुसरा भाग डिसेंबर २०१५ मध्ये बाजारात आणल्यावर त्याला पहिल्या महिन्यातच एक लाख डाऊनलोड मिळाले. याअ‍ॅपचे वापरकर्ते सरासरी ३० ते ३५ टक्के दराने वाढत आहेत. तर महसूल दरमहा ३० टक्के दराने वाढत आहे. २०१५ मध्ये फ्लिपकार्टचे एक प्रमुख अधिकारी असलेल्या मेकीन महेश्वरी यांनी या कंपनीत भरीव गुंतवणूक केली आहे.’’

‘मॉनस्टर मॅथ’चा वापर करून स्वतःत सुधारणा केलेल्या एका मुलीच्या पालकाने असे सांगितले की, लेखी व तोंडी परीक्षेत माझ्या मुलीची प्रगती चांगली होती. परंतु संगणक चाचणीच्या वेळेस तीन सेकंदात उत्तर देता न आल्याने ती निराश झाली होती. परंतु हे अॅप वापरायला सुरुवात केल्यापासून तिला गणित हा विषय गंमतीचा वाटू लागला आणि तिचे नैराश्य पार दूर झाले.

https://www.facebook.com/makkajai

६४ हजार ते १५ कोटी...
भारताची ‘पार्टी कॅपिटल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात जाऊन मौज-मजा करण्याच्या इराद्याने ‘त्या’ चार कॉलेज मित्रांनी प्रत्येकी १६ हजार रुपये याप्रमाणे ६४ हजार रुपये जमा केले. पण आपसात चर्चा करताना अचानक त्यांचा बेत बदलला. गोवा कॅन्सल करून जमवलेले पैसे आपल्या नव्या व्यवसायाचे बीज भांडवल म्हणून वापरण्याचे प्रतिक गुप्ता, परितोष अजमेरा, सुवीर बजाज आणि हर्षिल कारिया या तरुणांनी ठरवले. त्यावेळेला ते जेमतेम १९ वर्षांचे होते. आज वयाची पंचविशी पार करताना ‘फॉक्सी मोरॉन’ (www.FoxyMoron.in) ही त्यांची पूर्ण डिजिटल स्वरुपाची कंपनी वर्षाला १५ कोटींचा व्यवसाय करत असून देशातील एक आघाडीची डिजिटल कंपनी म्हणून तिने स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

डाटा एन्ट्रीपासून ते वेबसाईटचा कंटेंट तयार करण्यापर्यंत सर्व प्रकारची डिजिटल कामे करणाऱ्या या कंपनीला पहिल्याच मोठ्या कामात चांगलाच दणका बसला होता. त्या चौघांचीही कॉलेजेस दक्षिण मुंबईत असल्याने त्याच भागात असलेल्या हर्षिलच्या घराच्या एका खोलीत त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. एका मित्राच्या ओळखीतून त्यांना हजार-दीड हजार टी शर्टवर लोगो प्रिंट करण्याची मोठी ऑर्डर मिळाली. पण काही करणाने त्या पार्टीने प्रिंट केलेले टी-शर्ट नाकारले. या व्यवहारात त्यांना १.३ लाखांचा फटका बसला. पण त्यामुळे ही चौकडी डगमगली नाही. ‘आपण काही झाले तरी इतर मित्र भावंडाप्रमाणे ९ ते ५ नोकरी करायची नाही. कोणता तरी चौकटीबाह्य व्यवसाय करायचा’ असा त्या चौकडीचा निश्चय असल्याने त्यांनी पुन्हा प्रत्येकी २५ हजार रुपये जमा करण्याचे ठरवले. चौघेही व्यावसायिक कुटुंबातील असल्याने तसेच ही मुले उगाच इकडे-तिकडे पैसे उडवणार नाहीत उलट आपलाच व्यवसाय पुढे नेतील असा भरवसा असल्याने हे पैसे जमा होण्यात वेळ गेला नाही.

एखाद्या चित्रपटात शोभावे याचप्रकारे या यशकथेने पुढचे वळण घेतले. पीव्हीआर पिक्चर्सचे मालक राजन सिंग यांना एका वेबसाईटवर या चोघांच्या कामाची माहिती समजली. त्यांनी चित्रपटाची पोस्टर्स करण्याबद्दल विचारले. ‘जरूर, का नाही!’, त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने  सांगितले. या कामाच्या यशातून त्यांना धबधबा कामे मिळू लागली. मेबीललाइनसाठी (Maybelline) अभिनेत्री आलीया भटसोबत बेबी लिप्स कीस सॉंग चित्रित केले. त्यासाठी न्यूयॉर्क महोत्सवात पुरस्कार मिळवणारी ‘फॉक्सी मोरॉन’ आतापर्यंतची एकमेव एशिअन एजन्सी ठरली. लॉरीअर पॅरीससाठी मोहित चौहान सोबत ‘जड से जुडे’ कॅम्पेन केले. तसेच गार्निअर मेन यांचा एका गावाला वीज देण्याचा ‘प्रोजेक्ट चिराग’ हा महत्वाकांक्षी प्रकल्प त्यांनी केलाय. याच प्रकारे आणखी शंभर गावे प्रकाशमय करण्याच्या त्यांचा इरादा आहे.

‘फॉक्सी मोरॉन’मध्ये कोणी सीईओ-एसईओ म्हणून जबाबदारी पार पाडते तर कोणी ग्राफिक डिझाईन करते. कोणी एखाद्या इ-मेलला उत्तरे देतो. वर्षाला १५ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या ‘फॅाक्सी मोरॉन’ची मुंबई, दिल्ली, नाशिक अशा महानगरांत कार्यालये आहेत. त्यांच्याकडे व्हिडिओ प्रॉडक्शनची टीम आहे. डिजिटलमध्ये तर ते कोणत्याही प्रकारचे काम करू शकतात. यावर्षीच्या अखेरपर्यंत २५ कोटी रुपयांचे उद्दीष्ट गाठण्याचा ‘फॉक्सी मोरॉन’चा प्रयत्न आहे.

https://www.facebook.com/BeFoxy/

उद्याचे स्टिव्ह जॉब्स आणि बिल गेट्स ..

आज कित्येक तरूणांच्या स्टार्टअप्सचं मुख्य ऑफिस त्यांच्या कॉलेजचा कट्टा आणि जवळचे मित्र-मैत्रिण म्हणजे व्यवसायाचे पार्टनर्स आहेत;  लॅपटॉप हे त्यांच्या कंपनीचं बॅक ऑफिस आणि मोबाईल हे मार्केटिंग डिव्हिजन झालेलं आहे.  आलेले बरे वाईट अनुभवच त्यांचे गाईड आणि मेंटॉर असतात. आज ते त्यांच्या स्वत:च्याविश्वात रमलेले दिसतात.

त्यांच्या कडे  कल्पना आणि उर्जेचा उत्तम संगम आहे! या तरुणांनी मनाशी पक्के ठरवले तर त्यांच्या ठायी असलेली या दोन गुणांमुळे त्यांची झेप एकुणचं समाजाला कशी लाभदायी ठरू शकते हे दिसण्यासाठी इथ दिलेली दोन उदाहरणे पुरेशी बोलकी आहेत. प्रश्न आहे तो त्यांच्या कुटूंबाने आणि समाजाने त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा आणि त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहुन ‘चल लढ’ म्हणायचा !

नितीन पोतदार
सौजन्य : महाराष्ट्र टाईम्स

------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

Post a Comment

0 Comments