केसराची शेती..'अमेरिकन केसर’ पिकाच्या लागवडीचा प्रयोग जळगावच्या केळी पट्ट्यात

केसराची शेती..'अमेरिकन केसर’ पिकाच्या लागवडीचा प्रयोग जळगावच्या केळी पट्ट्यात..

अर्ध्या एकरात साडेपाच महिन्यात ५ लाख ४० हजार कमविणारा मराठी शेतकरी

अमेरिकेचा विषुववृत्तीय प्रदेश आणि काश्मीर खोऱ्यात प्रामुख्याने घेतल्या जाणाऱ्या अमेरिकन केसर’ पिकाच्या लागवडीचा प्रयोग जळगावच्या केळी पट्ट्यात यशस्वी झाला आहे. रावेर तालुक्यातील मोरगाव खुर्दच्या २६ वर्षीय संदेश पाटील यांनी वैद्यकीय शाखेचे शिक्षण सोडून जिद्दीच्या बळावर ही केसराची शेती फुलवली आहे. पीक पद्धतीत बदल करून संदेश यांनी अवघ्या साडेपाच महिन्यांत ५ लाख ४० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे.

संदेश यांनी बीएएमएसच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेतला. मात्र त्यात त्यांचे मन रमत नव्हते. जमिनीचे आरोग्य सुधारून पीक पद्धतीत वेगळा प्रयोग करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. घरातून वडील व काकांनी विरोध करून पाहिला. पण संदेश यांनी कुटुंबातील इतर सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांचे मन वळवले. त्यातच राजस्थानात अमेरिकी केसराच्या लागवडीची माहिती त्यांनी इंटरनेटवर वाचली. पुढे राजस्थानचे पाली शहर गाठून ४० रुपये नगाप्रमाणे १ लाख २० हजार रुपयांची ३ हजार रोपे खरेदी केली. इंटरनेटवरून केसरसंबंधी संपूर्ण माहिती जमवली. डिसेंबर २०१५ मध्ये अर्ध्या एकरात केसरची लागवड केली. थंड हवामानातच येणाऱ्या या पिकाचे भरघोस उत्पन्न घेण्याचे काम संदेश यांनी केवळ चिकाटीच्या बळावरच केले.

संदेश यांचे कुटुंब मूळात शेतकरीच, तरी वडील रमाकांत पाटील आणि काका संजय पाटील हे शिक्षक आहेत. नोकरी करून ते घरची ७ एकर शेती करतात. संदेश यांनी वयाच्या २३ व्या वर्षीच शेतीची सूत्रे हाती घेऊन अभिनव प्रयोग केले. येत्या आॅक्टोबरमध्ये ते आणखी एका एकरात केसरची लागवड करणार आहेत. संदेश पाटील यांनी यशस्वी केलेला प्रयाेग जिल्ह्यासह मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनाही भावला. शहादा, केऱ्हाळे, रावेर, निंभाेरा, अमळनेर, अंतुर्ली, मध्य प्रदेशातील पलासूर अशा विविध ठिकाणच्या १० शेतकऱ्यांना त्यांनी केसरचे बियाणे विक्री केले अाहे. प्रायाेगिक तत्वावर अाॅक्टाेबरमध्ये हे शेतकरी पिकाची लागवड करतील.
४० हजार किलोचा भाव, ६ लाख २० हजार उत्पन्न

पतंजली अायुर्वेदच्या १९:१९:१९ व १०:२६:२६, पीएसबी, अॅझेटाेबॅक्टर आदी सेंद्रिय व जैविक खतांचा वापर केला. तीन महिन्यांत केसराची काढणी सुरू झाली. मेमध्ये १५.५ किलाे केसर मिळवले. तपासणीत केसराचा अंश ४५% पेक्षा कमी असल्याने ४० हजार रुपये किलाेचा भाव मिळाला. एकूण ६.२० लाखाचे उत्पन्न झाले. बियाणे, पेरणी, अांतरमशागत, खते हा १.६० लाखाचा खर्च वजा जाता साडेपाच महिन्यांत ५.४० लाखाचे उत्पन्न मिळाले.

संदेश पाटील, शेतकरी. मोबाईल नं. 8698690990

Post a Comment

0 Comments