📃‘मूळ प्रमाणपत्रांची सक्ती नको’*

*📃‘मूळ प्रमाणपत्रांची सक्ती नको’*

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

प्रवेश घेताना महाविद्यालये विद्यार्थ्यांना मूळ प्रमाणपत्रे (ओरिजिनल सर्टिफिकेटस्) सादर करण्याची सक्ती करतात व त्यानंतर ती स्वतःकडे ठेऊन घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशांच्या अन्य पर्यायांचा लाभ घेता येत नाही. ‘अशाप्रकारे विद्यार्थ्यांना नाडाल तर याद राखा’ अशी तंबीच आता विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) महाविद्यालयांना दिली आहे. संबंधित महाविद्यालयांवर कडक कारवाईचा इशाराही यूजीसीने दिला आहे.
अभ्यासाच्या ताणाने विद्यार्थी आधीच हैराण असतात. त्यातच प्रवेशावेळी कडक नियमांना तोंड देताना त्यांच्या नाकी नऊ येतात. यूजीसीने याची गंभीर दखल घेतली आहे. अ‍ॅडमिशनच्या वेळी विद्यार्थ्यांकडून गुणपत्रिका, शाळेचा दाखला व अन्य संबंधित प्रमाणपत्रांच्या मूळ प्रती न घेता साक्षांकित प्रती घेतल्या तरी पुरेसे आहे. मूळ प्रमाणपत्रे केवळ तपासणीसाठी घ्यावीत आणि नंतर परत करावीत असे यूजीसीने बजावले आहे.
आगाऊ फीला मनाई
अनेक महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून अ‍ॅडमिशनच्या वेळी संपूर्ण वर्षाची फी आगाऊ घेऊन अडकवून ठेवतात. यावरही यूजीसीने कडक भूमिका घेतली आहे. ठरावीक सेमिस्टरसाठीच विद्यार्थ्यांकडून आगाऊ फी घेतली जावी असे निर्देश यूजीसीने दिले आहेत. इतर महाविद्यालयांत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेशप्रक्रियेच्या शेवटच्या तारखेच्या १५ दिवस आधीपर्यंत आधीच्या महाविद्यालयातील फी परत घेतली नाही तर १० टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम कापून घेऊ नये, विद्यार्थ्यांना प्रवेश माहितीपुस्तिका विकत घेण्याचीही सक्ती करू नये, असेही यूजीसीने बजावले आहे.

Post a Comment

0 Comments