व्यवसायाच्या वाटेवर चालताना

व्यवसायाच्या वाटेवर चालताना
भाग - २ – प्रत्यक्ष सुरवात, भांडवली उभारणी व सरकारी परवानग्या
-----------------------------------------------------------
लेख १५. कोणत्या परवानग्या लागतील?
-----------------------------------------------------------
व्यवसाय प्रकारानुसार भारतात व्यवसायाचे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. त्यामध्ये ग्रामीण व्यवसाय व शहरी व्यवसाय. ग्रामीण भागात तसा व्यवसायाचा विकास पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाला नाही. तरीही ६० टक्क्याहून अधिक जनता ही ग्रामीण भागात राहते त्यामुळे हे लोक शेती व शेतीपूरक व्यावसायावर अवलंबवून आहे. कृषी उत्पन्न हे करमुक्त उत्पन्न असल्याने व या भागातून इतर उद्योजकही कमी प्रमाणात असल्याने सरकारने परवानग्याचे प्रमाण नगण्यच ठेवले आहे. ग्रामीण भागात साधारणतः ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र हाच प्रोप्रायटरी साठी लागणारा एकमेव परवाना आहे. ग्रामपंचायतीने दिलेल्या ना हरकत प्रमाणपत्रावर उद्योजक बँकेत चालू खाते (Current Account) उघडू शकतो. हाच त्याचा व्यवसायाचा पत्ता (Address Proof) बनतो. मग या परवानगीच्या जोरावर उद्योजक पाहिजे तिथे विक्री करुन पैसे आपल्या खात्यावर मागवू शकतो.

शेतीवर आधारित व्यवसाय सोडल्यास इतर व्यवसायासाठी काही परवाने लागतात. त्याची चौकशी स्थानिक पातळीवर करुन ते परवाने प्राप्त करावेत. नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रात कोणताही व्यवसाय करायचा झाल्यास shop act दुकाने अधिनियम प्रमाणपत्र, मुंबई, १९६८ हा परवाना काढावा लागतो. हा प्रत्येक व्यवसायासाठी लागतोच. त्याशिवाय मेडिकल व्यवसाय सुरु करण्यासाठी food and drugs (FDA) या विभागाचे परवाने लागतात. खाद्यपदार्थाशी निगडित व्यवसायासाठी (मग तो चहावाला असो, वडापाव चा गाडा असो, हॉटेल, रेस्टॉरंट व इतर काहीही असो) तेथील पालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळावलेला परवाना लागतो. त्याचबरोबर आगीपासून सुरक्षा प्रमाणपत्र व FSS 2011 अंतर्गत काही परवाने लागतात. हॉटेल व्यवसायातील सेवेच्या दर्जानुसार व त्या ठिकाणच्या पालिका प्रशासन, राज्य शासन यांच्या नियमानुसार काही परवाने लागतात. पंचतारांकित हॉटेल साठी मुंबईत १५००, दिल्लीत २२०० तर बंगळुरू मध्ये ३००-४०० लहानमोठे परवाने लागतात.

आता आपण व्यवसायाचे प्रकार हे एमसीए (Ministry of Corporate Affairs) भारतीय उद्योग मंत्रालय, कंपनी कायदा व आयकर विभागासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या परवान्यानुसार पाहू जे सगळ्या व्यवसायास सारख्या प्रमाणात लागू होतात. व्यवसायाची नोंदणी ही प्रोपायटरी, पार्टनरशीप, एकल व्यक्ती कंपनी (One Person Company), एलएलपी (Limited Liability Partnership), प्रा. लिमिटेड कंपनी (Private Ltd Company), लिमिटेड कंपनी (Ltd Company), सेक्शन ८ कंपनी व NGO अशा प्रकारात करता येते.

👤 प्रोप्रायटरी – दुकाने अधिनियम मुंबई १९६८, विक्री व आयकर परतावा (Sales & IT Returns), सीएसटी व वॅट प्रमाणपत्र, बँकेतील चालू खाते, सीए व सीएस कडून लागणरे दस्तऐवज, राज्यसरकार, केंद्रसरकार, पालिका प्रशासनाचे व्यवसाय संबंधीत परवाने तसेच पहिल्या आर्थिक वर्षानंतर कर परतावा म्हणजेच Income Tax Return File व प्रोप्रायटरीच्या नावे वीजबिल, पाणीबिल व फोन बिल इत्यादी.

👤 पार्टनरशीप - हा ही प्रोप्रायटरीचाच भाग असतो या मध्ये फक्त यामध्ये प्रोप्रायटरची संख्या दोन किंवा अधिक असते. यासाठी प्रोप्रायटरीचेच सर्व परवाने व कागदपत्रे लागतात.

👤 एकल व्यक्ती कंपनी – प्रत्येक डायरेक्टरचे DIN (Director Identification Number), DSC( Digital Signature Certificate), वारसदाराचे संमतीपत्रक, MoU (Memorandum of Understanding), कंपनी नोंदणी प्रमाणपत्र व प्रोप्रायटरीत लागणारी सर्व कागदपत्रे व परवाने.

👤 एलएलपी, प्रा. लि. कंपनी व लि. कंपनी – DIN, DSC, MoU, Name Availability (नाव उपलब्धीचा अर्ज), कंपनी नोंदणी प्रमाणपत्र अर्ज १, २ व ३, कंपनी नोंदणी प्रमाणपत्र व प्रोप्रायटरीत लागणारी सर्व कागदपत्रे व परवाने.

एलएलपी व प्रा. लि. कंपनी साठी कमीत कमी दोन डायरेक्टर तर लि. कंपनीसाठी कमीत कमी ३ डायरेक्टर व ४ चार शेअर होल्डर्स अशी सात लोकांची टीम लागते. प्रा. लि. तसेच लि. कंपनीसाठी MoU बरोबरच MOA व AOA ची गरज असते. रजिस्ट्रार ऑफ कंपनी कडे याची नोंदणी करणे आवश्यक असते. त्याशिवाय सर्व व्यवसायासाठी त्याच्या त्याच्या गरजेनुसार पर्यावरण खात्याच्या परवानग्याचीही आवश्यकता असते. या परवानग्याचे होणारे फायदे व त्या कशा मिळवाव्यात? याविषयी आपण यापुढील दोन लेखात जाणून घेऊ.

टीप – ही माहिती प्रवेशासाठी आहे. सखोल माहिती आपल्या जवळच्या सीए / सीएस कडून घ्यावी. आपल्याला व्यवसायाच्या वाटेवर चालताना मदत व्हावी या हेतूने हे ज्ञान दिले जात आहे. हजारो प्रकारचे व्यवसाय एकाच प्रकारच्या लेखनात मध्यवर्ती धरताना हे होणे स्वाभाविक आहे. अर्थात ही माहिती खात्रीशीररित्या बरोबर आहेच. परंतु आपापल्या व्यवसायप्रकारानुसार तज्ञांचा सल्ला घेणे हितावह ठरते. येत्या काळात नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तींची नेमणूक ही केली जाईल.

- अमोल चंद्रकांत कदम, संपादक, नवी अर्थक्रांती

Post a Comment

0 Comments