राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा

राज्यातील हजारो शिक्षकांना दिलासा

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

शिक्षक भरतीला बंदी असतानाच्या काळात नेमणुका केलेल्या शिक्षकांची सेवा नियमित करण्याचे ठोस आश्वासन शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी शिक्षक आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी दिले. या शिक्षकांना सहाय्यक शिक्षकांचा दर्जा देण्याचा प्रस्तावही येत्या ३१ डिसेंबरपूर्वी निकाली काढण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यातील हजारो शिक्षकांना वर्षाअखेरीस ‘शुभवार्ता’ मिळाली आहे.

२ मे २०१२ नंतर शिक्षक भरतीवर बंदी असतानाही, मुंबईसह राज्यात सुमारे बाराशेहून अधिक शिक्षकांच्या नेमणुका झाल्या होत्या. त्यांच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यासह अनेक मुद्द्यांबाबत नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात शिक्षक आमदारांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यानंतर मंगळवारी शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात पुण्यात शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांच्या दालनात बैठक पार पडली. शिक्षक भरतीवरील बंदीच्या काळात नियुक्ती झालेल्या शिक्षकांच्या प्रश्नी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. २०१३ साली मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची आठवण यावेळी करून देण्यात आली. ही पदे नियमित करण्याबाबत आयुक्तांनी ठोस आश्वासन दिल्याची माहिती आमदार कपिल पाटील यांनी ‘मटा’ला दिली.

Post a Comment

0 Comments