फाईव्ह स्टार हॉटेल्सना करोडो रुपयांचा शेतीमाल पुरवणारी मराठी तरुणी - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, December 16, 2016

फाईव्ह स्टार हॉटेल्सना करोडो रुपयांचा शेतीमाल पुरवणारी मराठी तरुणी

फाईव्ह स्टार हॉटेल्सना करोडो रुपयांचा शेतीमाल पुरवणारी मराठी तरुणी
------------------------------------------

शेती हा बिझनेस आहे का?
हो नक्कीच. आम्ही करतो ना.
आर यू शुअर?
येस आय एम. धिस इज अ व्हेरी प्रॉफिटेबल बिझनेस.

या प्रश्नमालिकेपासून सुरुवात झाली सायली चुरीच्या (https://www.facebook.com/sayali.churi) करिअरची. तिचे वडील मकरंद आणि आई अंजली चुरी यांचा पंचतारांकित हॉटेलांना परदेशी भाज्या पुरवण्याचा, 'निसर्ग निर्माण अॅग्रो प्रोडक्टस प्रायव्हेट लिमिटेड' (http://nisargnirman.com) हा व्यवसाय होता.

वयाच्या दुस‍‍ऱ्या वर्षांपासून सायलीला या हिरवाईने वेड लावले. व्यवसाय लहान असताना घरात चालणा‍ऱ्या भाज्यांच्या पॅकिंगमध्ये लहानगी सायली हातभार लावायची. मोठे झाल्यावर तिला लक्षात आले की आपली आवडही हीच आहे. मग प्रथम तिने बायो-केमिस्ट्रीमध्ये पदवी घेतली. 'फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल'चा डिप्लोमा केला. यानंतर थेट पालकांच्या व्यवसायात उडी न मारता तिने आधी त्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचे ठरवले. '

एस. पी. जैन इन्स्टिट्युट अँड मॅनेजमेंट रिसर्च' या संस्थेतून तिने 'फॅमिली मॅनेज्ड बिझनेस' या विषयातून पदवी घ्यायचे ठरवले. तेथे गेली १३ वर्षं हा अभ्यासक्रम चालवला जातो. तिथे प्रवेश घेणारी सायली ही पहिलीच मराठी मुलगी. तिचे आई-वडील करत असलेला परदेशी भाज्यांची शेती हा 'व्यवसाय' आहे, हेच या संस्थेला पटत नव्हते. सुरुवातीचा संवाद या संस्थेमधलाच. मग तिथे पाच मुलाखती दिल्यानंतर 'शेती नुसता व्यवसायच नव्हे तर फायदेशीर व्यवसाय आहे', हे पटवण्यात सायली यशस्वी झाली. इथले शिक्षण यशस्वी पूर्ण करून सायलीने थेट आई-बाबांच्या ऑफिसमध्ये पाय ठेवला. तोपर्यंत तिच्या आई-बाबांनी पंचतारांकित हॉटेल्सनाही एक्झॉटिक व्हेज‌टिेबल्स पुरवण्याचे काम जोरात सुरू केले होते.

वडिलोपार्जित व्यवसाय म्हणजे फारसा संघर्ष नसणार, सगळे आयतेच हात आले असेल, असे अनेकांना वाटते. पण एक्झॉटिक भाज्या पुरवण्याचा हा व्यवसाय दिसतो तितका सरळसोपा नाही. त्यात प्रचंड परिश्रम आहेत. इथे माल पोहोचण्यात एक दिवसही उशीर झाला तरी फार महाग पडतो. हा माल तुम्ही अचानक उत्पन्न करू शकत नाही. त्यासाठी सुरुवातीपासून नियोजनच आवश्यक असते. सायली आल्यावर तिने आपल्याकडील ज्ञानाने या व्यवसायात आणखी भर घातली. सगळ्यात आधी काय केले असेल तर प्रभावी मार्केटिंग. आपले प्रोडक्ट किती उत्तम आहे आणि आपणच ते पुरवण्यासाठी योग्य व्यावसायिक कसे आहोत, हे पटवून देण्यात सायली तरबेज झाली. पण हे सगळे तिने प्रत्यक्ष शेतात काम करण्यापासून मिळवले.

'निसर्ग निर्माण'कडे विविध ठिकाणच्या शेतक‍ऱ्यांकडून निरनिराळ्या प्रकारच्या भाज्या रोज मागवल्या जातात. कोणाकडून, कोणत्या वेळेला, कोणत्या भाज्या येणार आहेत, याचे वेळापत्रक बनवलेले असते. त्याप्रमाणे शेतकरी या भाज्या निसर्ग निर्माणमध्ये पोहोचवतात. इथे पुन्हा एकदा त्यांची तपासणी होऊन त्या भाज्या परत पंचतारांकित हॉटेलांकडे रवाना होतात. आज घडीला इथे उटी, बेंगळूरू, हैद्राबाद, चेन्नई, अहमदाबाद, दिल्ली, नैनिताल, सांगली, सातारा, बारामती, नाशिक, पुणे, कोकण, इंदापूर इतक्या विविध ठिकाणांवरून भाज्या आणल्या जातात. इतक्या ठिकाणच्या शेतक‍ऱ्यांना विविध हॉटेलांच्या गरजेनुसार वेळापत्रक बनवून देणे, ते व्यवस्थित पाळले जातेय ना ते पाहणे त्यात काही बदल असतील तर झटपट निर्णय घेणे. हे सगळे काम सायली पार पाडते. शिवाय स्वतःच्या चुरी फार्ममध्ये घेतले जाणारे उत्पादन आणि तिथे होणा‍रे संशोधन यातही सायलीची भूमिका महत्त्वाची असते. फक्त शेतात उगवणा‍ऱ्या पिकाबद्दलच नव्हे तर त्यासाठी वापरल्या जाणा‍ऱ्या तंत्रज्ञानाकडेही ती बारकाईने लक्ष देते. त्यांच्या शेतात लसूण सोलायचे यंत्र आहे, हे नुसते वापरणेच नव्हे तर दुरुस्त करणेही तिला जमते.

सायली सांगते, पंचतारांकित हॉटेल्सना माल पुरवायचा म्हणजे काही निकष पाळावे लागतात. त्यांच्याकडे जाणा‍ऱ्या प्रत्यक गोष्टीचे विशिष्ट, वजन, आकार, बियाणे आदी गुणधर्म ठरवून घेतलेले असतात. यात थोडी जरी चूक झाली तरी हा माल नाकारला जाण्याची भीती असते. म्हणून शेतक‍ऱ्यांना बियाणे देणे, ती पिके तयार होण्यासाठी किती वेळ लागतो हे सांगणे ही सारी कामे निगुतीने करावी लागतात. आता सायलीने या व्यवसायात नवनव्या तंत्रज्ञानाची ओळख शेतक‍‍ऱ्यांना करून द्यायला सुरुवात केली आहे. सोबत तिने सेंद्रिय शेती करण्यातही पाऊल टाकले आहे. यासोबतच हायड्रोपोनिक सिस्टमसारख्या नव्या तंत्रज्ञानावर तिचे प्रयोग चालू आहेत. इथे निसर्ग हाच राजा असतो. त्याच्यापुढे आपण जाऊ शकत नाही. कधी कधी अचानक वातावरण बदलते. पिके बिघडायला एवढे पुरेसे असते. मग शेतकरी दिलेल्या वेळेत त्याची ऑर्डर पोहोचवू शकत नाही. काहीवेळा लांबून येणारा माल रस्त्यातील बंद किंवा काही अडचणींमुळे मध्येच अडून राहतो. अशावेळी त्या शेतक‍‍ऱ्याला दिलासा देणे आण‌ि सोबतच आपल्या कस्टमरकडे दिलेल्या वेळेच्या आत पर्यायी व्यवस्था करून ऑर्डर पूर्ण करणे महत्त्वाचे असते. मध्यंतरी एक राष्ट्रीय महामार्ग बंद पडला होता. त्यावेळी तिकडून येणा‍ऱ्या सर्व ऑर्डर्स दुसऱ्या मार्गाने वळवाव्या लागल्या होत्या. आता शेतीत कोणती पिके घ्यावीत, त्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल माहिती देणे अर्थात फार्म ग्राफ्टिंगही सायलीने सुरू केले आहे. या सा‍ऱ्याच्या बळावरच सायली आज 'निसर्ग निर्माण'चा तब्बल सहा कोटी रुपयांचा व्यवसाय अत्यंत कौशल्याने सांभाळते आहे.

सौजन्य: दैनिक महाराष्ट्र टाइम्स
------------------------------------------
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे फेसबुक पेज नक्की लाईक करा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here

Pages