ब्रान्ड 'अम्मा'ने गाठले लोकप्रियतेचे शिखर 

ब्रान्ड 'अम्मा'ने गाठले लोकप्रियतेचे शिखर 

अभिनय क्षेत्र सोडून जयललिता जेव्हा राजकारणात आल्या तेव्हा कोणीही विचार केला नव्हता की त्या इतक्या लोकप्रिय होतील कि त्यांच्या नावाने ब्रान्ड तयार होईल. त्यांच्या नावाने नुसता ब्रान्डच तयार झाला नाही अम्मा ब्रान्डने लोकप्रियतेचे शिखर गाठले. तामिळनाडूत जयललितांना अम्मा म्हणजेच आई म्हणत. अम्मा या ब्रान्डखाली अनेक घरगुती वापराच्या वस्तू, खाण्यापिण्याचे जिन्नस तामिळनाडू बाजारात उपलब्ध आहे.

तामिळनाडू राज्यातील सर्व शहरांमध्ये न्याहरी आणि भोजन स्वस्त दरात मिळण्यासाठी ‘अम्मा उपाहारगृहे’ उघडण्यात आली. सर्व प्रमुख शहरे आणि रेल्वे स्थानकांमध्ये बाटलीबंद पाणी ‘अम्मा मिनरल वॉटर’ केवळ १० रुपयांना उपलब्ध आहे. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये ‘अम्मा फार्मसी’ सुरू करण्यात आली असून तेथे स्वस्त दराने औषधे मिळतात. नवजात अर्भकांसाठी लागणाऱ्या गरजेच्या वस्तू ‘अम्मा बेबीकिट’ च्या माध्यमातून मोफत दिल्या जातात. स्वस्त दरात १४ रुपये किलो दराने ‘अम्मा सॉल्ट’ अर्थात मीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरिबांना घरे बांधण्यासाठी स्वस्त दराने ‘अम्मा सिमेंट’ उपलब्ध आहे. गरजू महिलांना अम्मा मोबाईल उपलब्ध करून देण्यात आले. गरीब महिलांना ‘अम्मा मिक्सर’ मोफत उपलब्ध. जवळपास २६ हजार रुपये किमतीचा ‘अम्मा लॅपटॉप’ राज्यातील ११ लाख विद्यार्थ्यांना वाटण्याची योजना सुरू आहे.

Post a Comment

0 Comments