शेतकरी झाला उद्योजक, विकतो पॅकिंगमधून पीठ
------------------------------------------
उत्पादनाएवढेच महत्त्व मालाचे ग्रेडिंग, पॅकिंग, प्रक्रिया या बाबींना आले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील तरुण शेतकरी अमोल पाटील याने काळाचा वेध घेत मल्टिग्रेनयुक्त चणापिठाची निर्मिती केली आहे. सरस्वती ब्रॅंडद्वारे विविध वजनांत आकर्षक पॅकिंग करून परिसरातील गावे व जिल्ह्यात त्याला मार्केट तयार केले आहे.
--------------
सांगली जिल्ह्यातील कडेगाव हे विटा- कऱ्हाड मार्गावरील मुख्य गाव आहे, त्यामुळे परिसरातील गावांचा खरेदी, बाजारानिमित्त या गावाशी सतत संपर्क असतो. याच गावात राहणाऱ्या अमोल शिवाजी पाटील या युवा शेतकऱ्याने आपला प्रक्रिया उद्योग थाटला आहे. अमोल यांचे मूळ गाव कडेगाव तालुक्यातील सोनकिरे. येथे त्यांची ३ एकर शेती आहे. वडिलांनी शेती करत कडेगावमध्ये स्वतःचा एक व्यवसायही उभा केला होता. दोन्हींची कसरत करीत आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यानंतर ते कडेगाव येथेच स्थायिक झाले. अमोल यांनी बी.एस्सी. बॉटनीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर एमबीएचे एका वर्षाचे शिक्षण घेतले.
मल्टिग्रेन चणापिठाचा उद्योग
शिक्षण घेत असताना आपला उद्योग असावा असे अमोल यांना वाटायचे. शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी असल्याने शेतीमालावर प्रक्रिया करण्यासारखा कोणता व्यवसाय करता येतो का याच्या अभ्यासाला सुरवात केली. त्यानुसार हरभरा (चणा) डाळ प्रक्रिया उद्योगाला प्रारंभ केला. त्यात हळूहळू बस्तान बसले. आता पुढील टप्पा गाठायचे ठरवले. मल्टिग्रेनयुक्त म्हणजे विविध पिठांचे मिश्रण असलेल्या चणापिठाला (बेसन) मार्केट चांगले असल्याचे लक्षात आले, त्यानुसार पावले उचलली.
असा केला अभ्यास
डाळप्रक्रिया उद्योग उभारताना सांगली जिल्ह्यातील उद्योगांना भेटी दिल्या, त्यात माहिती अपुरी मिळाली. त्यामुळे अकोला भागातील डाळमिल युनिटना भेटी दिल्या. यंत्रांची माहिती घेतली. त्यानंतर गुजरात येथून डाळप्रक्रियेसाठी यंत्रसामग्रीची खरेदी केली.
भांडवल
व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की भांडवल लागतेच, हे लक्षात घेऊन पंतप्रधान स्वयंरोजगार निर्मिती योजनेद्वारे बॅंक ऑफ इंडियाच्या मदतीने कर्ज घेतले. सुमारे १८ लाख रुपयांचे कर्जाऊ भांडवल व स्वतःकडील तसेच मित्रमंडळी, पाहुणे यांच्याकडून मदत घेत २५ लाख रुपयांचे भांडवल उभारले. जागेचा खर्च वेगळा धरावा लागतो. कडेगाव येथे प्रकल्पासाठी एमआयडीसी प्रक्षेत्रात जागा घेतली आहे. आज बेसन पीठ व डाळमिल अशी दोन यंत्रे आहेत.
प्रशिक्षण
पुणे येथील खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये एका महिन्याचे डाळ प्रक्रियेचे प्रशिक्षण घेतले. यामध्ये सर्व बारकावे अभ्यासले. उद्योगातील अडचणींशी सामना करणे त्यामुळे शक्य झाले. बेसन पीठ बनविण्याच्या यंत्राची व प्रक्रियेची माहितीही घेणे सुरू केले. गुजरातमधून हे यंत्र आणले.
उद्योगाची सुरवात
डाळनिर्मिती व विक्री सुरू केली. प्रत्येक दुकान ते दुकान असे मार्केटिंग केले. त्यामध्ये विक्री करताना अडचणी आल्या. सुरवातीच्या काळात २०० ते ३०० किलो डाळीची विक्री सुरू होती. डाळ विक्रीनंतर पुढचा टप्पा म्हणून बेसन पीठ विक्री सुरू केली.
पॅकिंगचा अभ्यास केला
बझार, दुकान, मॉल व्यावसायिक व ग्राहकही पॅकिंग केलेल्या उत्पादनांना पसंती देतात याचा अभ्यास झाला. यानुसार बाजारपेठेत जाऊन पॅकिंगचा अभ्यास केला. बाजारपेठेतील दुकानदारांचा कल, ग्राहकांना कोणत्या पॅकिंगमध्ये माल हवा याची माहिती प्रत्यक्षात घेणे सुरू केले.
पॅकिंगविषयी इंटरनेटवर शोधणे सुरू केले. पॅकिंग कसे असावे, त्यावरील प्रिटिंगसाठीचा मजकूर कसा असावा याची माहिती घेतली. त्यानंतर प्लॅस्टिक पाऊचची निवड केली. सांगली येथे त्यावर छपाई करून घेतली. त्यावर चणापिठाविषयी संपूर्ण माहिती दिली.
विविध वजनांत पॅकिंग
पॅकिंग केल्यानंतर पुन्हा बाजारपेठेची गरज होती, त्यामुळे पुन्हा मार्केटिंग सुरू केले. प्रत्येक दुकानदाराला चणापिठाचा नमुना देत वापरा आणि मग फीडबॅक द्या, ग्राहकांनाही द्या, त्यांच्याकडूनही तसा फीडबॅक घेऊन सांगा, असे सांगत मार्केटिंग सुरू केले. पिठाची चव आणि आर्कषक पॅकिंग केल्याने ग्राहकांच्या ते पसंतीस उतरू लागले.
पाटील यांचा उद्योग- दृष्टिक्षेपात
- ब्रॅंडचे नाव मल्टिग्रेनयुक्त चणापीठ अर्थात सरस्वती प्रीमियम क्वालिटी ब्रॅंड
- ग्राहकांच्या मागणीनुसार विविध वजनाचे पॅकिंग
- २५० ग्रॅम, ५०० ग्रॅम व किलोचे पाऊच पॅकिंग
- गोणी पॅकिंग - १० किलो व ५० किलो
- एमआरपी - १६० रुपये प्रतिकिलो
- पॅकिंग खर्च वाढला, पण मागणीही वाढली
- दिवाळी, दसरा, गणपती उत्सव, लग्न समारंभ या काळात २५ टक्के मागणी वाढते.
- कडेगाव, कऱ्हाड, विटा या परिसरातील व्यापाऱ्यांसह कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत विस्तार
- मालाचा पुरवठा स्वतः अमोल करतात.
- सुमारे ४ ते ५ जणांना मिळाला रोजगार
अर्थकारण
महिन्याला अंदाजे दीड टन ते कमाल दोन टनांपर्यंत पिठाची विक्री होते. सणासुदीच्या दिवसांत ती वाढते. हरभरा डाळीची विक्री फारशी केली जात नसली तरी पहिला व्यवसाय म्हणून २०० ते ३०० किलोच्या दरम्यान होते. बाजारपेठेत चणापिठाला मागणी आहे. त्याचे दर पंधरा दिवसांनी बदलतात. यामुळे होलसेलचा दरही कमी- अधिक होतो असे अमोल म्हणाले. या उद्योगातून वर्षाला १० टक्के नफा मिळतो असेही त्यांनी सांगितले.
मल्टिग्रेन धान्याची क्वालिटी
चणापीठ तयार करताना फक्त हरभरा डाळीचा वापर न करता त्यामध्ये वाटाणा, मका अादी तीन ते चार प्रकारच्या डाळी वापरल्या जातात. यामुळे चणापिठाला चांगली चव येतेच, शिवाय त्याची पौष्टिकताही वाढते. मागणी आली की धान्यनिर्मिती होते, त्यामुळे सतत ताजा माल उपलब्ध होतो, यामुळे मागणी वाढत असल्याचे पाटील यांनी सांगितले.
फोनवर मार्केट
बाजारात सरस्वती ब्रॅंडची अोळख झाल्याने अनेक दुकानदार फोनद्वारे ऑर्डर देतात, यामुळे पाटील यांना ऑर्डर घेण्याच्या वेळेत बचत करता आली. सध्या बाजारात मागणी जास्त अाहे, मात्र कच्चा माल कमी पडत आहे. त्यासाठी किमान दोन ते तीन टन पीठ तयार होईल एवढा हरभरा खरेदी करून ठेवला जातो.
शेतकऱ्यांकडून खरेदी
रब्बी हंगामात परिसरातील शेतकऱ्यांकडून हरभऱ्याची खरेदी बाजारभावाप्रमाणे केली जाते. कमी पडलेला हरभरा सांगली बाजार समितीतून घेतला जातो.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.