लेख ३८ – व्यवसाय बंद झालेल्या अवस्थेतून वेगवान वाढीच्या अवस्थेत नेण्यासाठी --------------------------------------


-----------------------------------------
लेख ३८ – व्यवसाय बंद झालेल्या अवस्थेतून वेगवान वाढीच्या अवस्थेत नेण्यासाठी
-----------------------------------------
असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी मोठ्या उमेदीने व्यवसाय सुरु केला. स्वतःच्या ताकदीचा व बुध्दीचा वापर करुन तो व्यवसाय काही वर्षे चालवला. काही प्रमाणात नफा सुध्दा मिळवला. भांडवलाची उभारणी केली. आयुष्याची जमापूंजी व्यवसायात लावली. आणि आता तो व्यवसाय वेगवेगळ्या कारणाने तुंबला गेला आहे. अडला आहे. जायबंदी झाला आहे. बाहेरही पडता येत नाही. पुढेही जाता येत नाही. डोक्यावर कर्ज आहे. देणी वाढत आहेत. येणी कमी होत आहेत. अशा परिस्थितीत काय करावे? हा प्रश्न फार अवघड असतो. आपण या परिस्थितीत आहोत हे कुणाला सांगावे तर जे काही लोक सोबत आहेत त्यांचा सुध्दा विश्वास कमी होणार. सांगूनही त्यांच्याकडेही त्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असे नाही. नवीन कर्ज काढायला जावे तर पहिल्या कर्जाचे हप्ते सगळीकडे दिसतात. त्यामुळे नवे कर्ज मिळत नाही असा समज तयार होतो. प्रश्न दिवसेंदिवस वाढत जातात. उत्तराचे दरवाजे बंद होत असतात. व्यवसाय विकताही येत नाही. चालवताना अडथळे येत राहतात. कुटुंबातील इतर प्रश्न वाढत जातात. आपल्या बरोबरीचे लोक नोकरी करुन दरमहा बऱ्यापैकी पैसे घरी घेऊन येत असतात. याउलट आपण मात्र सगळीकडून जमवून आणलेले पैसे परत व्यवसायात गुंतवण्यासाठी व व्यवसायाला परत चांगल्या स्थितीत आणण्यासाठी वापरत असतो. यावरचा उपाय विचारायचा कोणाला?

कोणत्याही अवघड परिस्थितीतून बाहेर पडण्याचा एक प्रभावी मार्ग सांगतो. मग तो प्रसंग व्यवसायातील असो, शैक्षणिक असो, सामाजिक असो, किंवा कौटुंबिक असो सगळ्या ठिकाणी हा उपाय लागू होतोच. तर याचे तीन टप्पे जाणून घेऊ या. त्याआधी एक उदाहरण जाणून घेऊ या.

घडलेल्या घटना कोणतीही असो आता त्याचा स्वीकार करावाच लागणार असतो. म्हणून जास्त वेळ वाट न पाहता लगेच त्याचा स्वीकार करा. जेणेकरुन त्यातून बाहेर पडण्याची मनाची तयारी होईल. लोक काय म्हणतील याचा अजिबात विचार न करता यापुढील प्रत्येक कृती करायची आहे. माझा पाय मोडला किंवा माझ्या आयुष्यात नको असणारी घटना घडली तर आता मला त्याचा स्वीकार करावाच लागेल. नाहीतर माझा पाय असता तर मी काय काय करु शकलो असतो? या विचाराने काही न करता केवळ आता माझ्याकडे पाय नाही म्हणून हताश होणे सोडून दिले पाहिजे. यानंतर त्या नको असणाऱ्या घटनेसाठी आपण किती दिवस दुःखी होणार आहोत? ते ठरवा. त्याची कालमर्यादा स्वतःच्या मनाला विचारून ठरवा. मग तो काळ काही मिनिटांचा, काही तासांचा, काही दिवसाचा किंवा आठवडाभर महिनाभर असा कितीही असू द्या. मग तेवढा काळ ते दुःख जेवढ्या वेळा व्यक्त करायचे आहे तेवढ्या वेळा ते व्यक्त करा. कारण आनंद जसा व्यक्त करायचा असतो. तसे दुःख सुध्दा व्यक्त करायचे असते. आनंद एक भावना आहे त्याचप्रमाणे दुःख, निराशा, अपयश यासुध्दा भावनाच आहेत आणि भावनांपासून मुक्ती पाहिजे असल्यास त्या व्यक्त करणेच फायदेशीर ठरते. म्हणून आपल्याकडे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर ठराविक दिवस शोक व्यक्त करतात. त्यानंतर गोडाचा कार्यक्रम करुन त्या स्मृती सोडून दिल्या जातात. मात्र हा दुःख व्यक्त करण्याचा कालावधी संपून गेला की जीवनात परत त्या गोष्टीची साधी चर्चा करण्यात सुध्दा वेळ घालवू नका. तसेही आपण अशा अडचणीत अडकलेलो असतो की आपल्याला सावरायला सुध्दा वेळ नसतो. आता मनाला हे सांगून टाका की या ठराविक गोष्टीसाठी जेवढे काही चांगलेवाईट वाटून घ्यायचे होते ते पूर्णपणे घेतले आहे. आता बंद म्हणजे बंदच. हा कालावधी संपता क्षणीच लगेच कामाला लागा.

दुसऱ्या टप्प्यात स्वतःला हा प्रश्न विचारावा लागेल की, या घडलेल्या घटनेत मी काही सकारात्मक बदल करु शकतो का? असल्यास ते कोणते? या दोन प्रश्नांची उत्तर तत्काळ शोधून काढायची. जर उत्तर हो असे असेल तर कोणकोणते बदल करु शकतो? हे शोधून काढून अंमलबजावणी साठी सुरुवात करा. हाच केवळ यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. जर उत्तर नकारार्थी असेल तर आपण ज्याचे काही करु शकत नाही त्याच्यावर चिंता, दुःख व्यक्त करण्यात काय मुद्दा आहे? म्हणून तो विषय तिकडेच सोडून द्या.

तिसऱ्या टप्प्यावर आपली बलस्थाने (Strength) परत एकदा लिहून काढा. नव्याने ग्राहक शोधा. नवा बिझनेस प्लॅन तयार करा. दिवसभराच्या प्रचंड मेहनतीनंतर रात्रीच्या थकव्याने कधी झोप लागते हे कळत नाही. तरीसुध्दा दुसऱ्या दिवशी परत नवा उत्साह आपल्याला प्राप्त होतो, आपण आधीच्या दिवसाचा थकवा विसरुन कामाला लागतो. त्याचप्रमाणे व्यवसायाला अडकलेल्या व्यवसायाला नव्याने उभारण्यासाठी आज नवा दिवस उजाडला आहे. तेव्हा चला या ज्ञानप्रकाशाच्या ज्योतीने आपला व्यवसाय परत एकदा चमकवायला सिध्द होऊ या.

यानंतर दोन लेख लिहून ही लेख मालिका पूर्ण होणार आहे. तुमचे व्यवसायविषयक जे पण कोणते प्रश्न असतील ते कमेंट बॉक्स मध्ये लिहा. बऱ्यापैकी सर्व प्रश्नांची उत्तरे दिली गेली आहेत. इतरही सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतीलच हा विश्वास ठेवा. आपल्या उपयोगी पडण्याची ही बहुमोल संधी फेसबुकच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झाली. आपण या निमित्तांने आमच्यावर भरभरुन प्रेम केले. आम्हाला आपले मानून तुमचे जे काही प्रश्न असतील ते थेट विचारले. त्याबद्दल आम्ही आपले सतत कृतज्ञ आहोत. धन्यवाद!!

आपले असेच प्रेम दिवसागणिक वाढत राहो व आम्हाला आपली सेवा करण्याची संधी सतत मिळत राहो ही अपेक्षा. परत एकदा आभार.

-

Post a Comment

0 Comments