शून्यातून कोट्यवधींचे विश्व उभारणारा रिक्षावाला

शून्यातून कोट्यवधींचे विश्व उभारणारा रिक्षावाला
------------------------------------------

राष्ट्रकुलच्या स्पर्धा पुण्यात व्हायच्या होत्या. त्या निमित्ताने बालेवाडीला स्वतंत्र स्टेडियम उभारले गेले. परदेशी खेळाडूंच्या निवासासाठी प्रशस्त पंचतारांकित हॉटेल उभारले गेले. पण या उत्साहाला गालबोट लावणारी घटना घडली. हॉटेलमधील खेळाडू आपापसात कुजबूजू लागले आणि या कुजबुजीचे रुपांतर हॉटेल सोडण्याच्या निर्णयात झाले. हे परदेशी खेळाडू हॉटेल सोडून आपापल्या देशाकडे निघाले. असे झाले तर स्पर्धेचा बोजवारा वाजणार होता, शोध घेतल्यावर कळले की खेळाडूंना उंदीर दृष्टीस पडले आहेत. या वेळी पवन साळवी हे आरोग्य अधिकारी म्हणून काम करीत होते. त्यांनी राजेंद्र गायकवाडांना यासाठी पाचारण केले. तीन दिवस मोहीम राबवून गायकवाडांनी तीस उंदीर पकडले आणि खेळाडूंचे समाधान झाले. प्रसारमाध्यमांनी त्यांना "रॅट किंग" ही पदवीही बहाल केली.
----------

पुण्याच्या दत्तवाडीत लहानाचे मोठे झालेल्या गायकवाडांचे आई-वडील मोल-मजुरी करीत आणि सहा मुलगे आणि एक कन्या यांचा प्रपंच चालवीत होते. राजेंद्रजी दहावीत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि शिक्षणाबरोबर काम करण्यास त्यांना सुरुवात करावी लागली. शनिवार पेठेतील रामकृष्ण गाडगीळ यांच्या कीटक नाशक फवारणी यंत्राच्या उद्योगात काम मिळाले आणि या क्षेत्राशी त्यांची ओळख झाली. फॉगिंग मशीन दुरुस्तीचे कामही त्यांनी आत्मसात केले. बी.कॉम. ची पदवी मिळवल्यावर काही नवा मार्ग शोधावा म्हणून त्यांनी रिक्षा चालविली. पण नव्या संधीचा शोध ते घेतच होते.

तशातच एक फॉगिंगचा पंप दुरुस्त केल्यावर पुन्हा कीटकनाशनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान प्राप्त करुन त्यांनी स्वतःचा उद्योग जी. टी. पेस्ट कंट्रोल (http://www.gtpestcontrol.com) या नावाने सुरु केला. खानापूरच्या वेंकटेश्वरा हॅचरिजच्या पोल्ट्री फार्मचे उंदीर नियंत्रण करण्याचे काम त्यांनी घेतले. पहिल्या पंधरवड्यातच कंपनीने त्यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आणि यशाच्या पथावर वाटचाल सुरु झाली. पोल्ट्री फार्म आणि जी.टी. पेस्ट कंट्रोल यांचे समीकरण तयार झाले. कष्ट, योजकता आणि ग्राहकांमध्ये तयार झालेला विश्वास यांचे चीज होऊ लागले. सायकलवरून एक पंप पाठीला लावून पेस्ट कंट्रोल करणार्‍या गायकवाडांना वेंकटेश्वरा हॅचरिजची सर्व पेस्ट कंट्रोलची कामे मिळाली आणि उत्कर्षाचे विस्तीर्ण क्षेत्र खुले झाले.

कर्मचार्‍यांची सतत काळजी आणि कंपनीच्या प्रगतीचा ध्यास असणारे श्री. राजेंद्र गायकवाड यांनी देशभर आपल्या व्यवसायाचे जाळे पसरवले. पण त्यासाठी प्रसिद्धी माध्यमाचा वापर त्यांना करावा लागला नाही. त्यांचे काम हेच त्यांच्या प्रसिद्धीचे साधन ठरले. आपल्या गुणवत्तेचे सातत्य टिकवून त्यांनी आय. एस. ओ. ९००१: २००० हे प्रमाणपत्रही मिळवले. आपली कार्यशैली, गुणवत्ता व पर्यावरण सुसंगत काम यामुळे राजेंद्र गायकवाड हे यशाचे शिखर गाठू शकले. त्यांच्या व्यावसायिक जीवनात अनेक घटना अशा आहेत की त्यांना त्या अभिमानास्पद वाटतात. आज भारतातील अनेक प्रमुख शहरात त्यांच्या कंपनीच्या शाखा आहेत. सिंगापूरमध्येही त्यांची एक शाखा सुरु झाली आहे. वार्षिक उलाढाल ४ कोटींच्या आसपास असून चारशे कर्मचारी सतत कार्यरत आहेत.

जागतिक पातळीवर पेस्ट कंट्रोलच्या व्यवसायात होणारे बदल आत्मसात करण्याचा प्रयत्न राजेंद्र गायकवाड सतत करीत असतात. ते म्हणतात, "आमचे काम पर्यावरणाशी सुसंगत ठेवण्याचे आमचे धोरण आहे. घरगुती पेस्ट कंट्रोलपासून सुरु झालेले आमचे काम आज कंटेनर आणि वूड पॅकेजिंगमध्ये कार्यरत आहे. परदेशी पाठविल्या जाणार्‍या मालाच्या सुरक्षेची हमी आम्ही देतो. जागतिक पर्यावरणाचे निकष आधारभूत धरुन आय.एस.ओ. १४००-२००४ मिळविणारी आमची कंपनी ही एकमेव आहे. माझ्या कर्मचार्‍यांशी माझे विस्तीर्ण कुटुंबासारखे संबंध आहेत. सर्व कर्मचारी सातत्याने माझ्या संपर्कात असतात. सिंगापूरमध्ये पेस्ट कंट्रोल या विषयातील शाखा कार्यरत आहे. "

"मी शून्यातून हे विश्व उभे केले, आव्हाने स्वीकारली आणि पूर्णही केली. याप्रावासात मी पैशाला महत्त्व दिले नाही. माझ्या घामाचा, कष्टाचा पैसा मला मिळणारच आहे. मी माझ्या इच्छाशक्तिच्या जोरावर यशस्वी झालो."

कंपनीच्या सुमारे २५ वर्षांच्या या वाटचालीत रसायनाचा वापर करताना, फवारणी अगर वाहतूक करताना कधीही अपघात झाला नाही यापेक्षा जी.टी. पेस्ट कंट्रोलचा सुरक्षेचा दुसरा कोणता पुरावा असेल?

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील वसतिगृहातील पेस्ट कंट्रोलचे काम ही मोठी संधी ठरली. हे आव्हान समर्थपणे पेलल्यामुळे कंपनीचा नावलौकिक वाढला तसेच आर्थिक फायदाही झाला. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे डेंग्यू-निर्मूलनाचे काम अतिशय प्रभावी ठरले. यासारखे असे अनेक यशस्वी अनुभव राजेंद्र गायकवाडांच्या यशोगाथेत आहेत. गेल्या ४-५ वर्षांपासून जी.टी. पेस्ट कंट्रोल कंपनी टाटा मोटर्स, थरमॅक्स, सुलझर, कल्याणी स्टील्स, भारत फोर्ज इ. अनेक नामवंत कंपन्याचे हाऊस-कीपींग आणि पेस्ट कंट्रोलचे काम यशस्वीपणे करत आहे.

जी.टी. पेस्ट कंट्रोलचे मॅनेजिंग डायरेक्टर मा. राजेन्द्रजी गायकवाड यांच्या व्यावसायिक कुशलतेमुळे ४०० एकरात सामावलेली मगरपट्टा सिटी तसेच ७०० एकर जमिनीत निर्माण होऊ पाहणारी नांदेड सिटी पेस्ट कंट्रोलमुळे जंतूविरहीत व प्रदूषणमुक्त झालेली आहे. त्यांच्या ह्या अविरत, अथक कौशल्ययुक्त पिरश्रमांमुळे रांजणगाव एम.आय.डी.सी. मध्ये हीट-प्लँटद्वारा लाकडांवर जंतूमुक्त करण्यची प्रक्रिया सुरु केली आहे.

"मी शून्यातून विश्व उभे केले, मी स्वतःचा रस्ता शोधला. दुःख दैन्य यातून मुक्ति हवी असेल तर ही खडतर वाट चालावीच लागेल. 'अकेला ही निकला था। मगर कारवॉ बनते गया।' याप्रमाणे आज ४०० माणसांना रोजगार देण्याची क्षमता माझ्या व्यवस्यात निर्माण झाली. मी अंतःकरणाचा आवाज ऐकला आणि हा भव्य व्यवसाय उभा राहिला."

राजेंद्र गायकवाडांची व्यवसाय व सामाजिक माध्यमातून अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांशी ओळख झाली. समाजऋणातून उतराई होण्याची त्यांची दिशा निश्चित आहे. लोकांच्या अडीअडचणी सोडविणारा म्हणून गायकवाडांचा त्यांच्या परिसरात नावलौकिक आहे. आजही गरजू विद्यार्थ्यांना ते मदत करतात. गेल्या १० वर्षात १२ ते १५ मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे.

राजेंद्र गायकवाडांचे यशाबद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

जी.टी. पेस्ट कंट्रोल कंपनी प्रा. लि.
देवगिरी अपार्टमेंट, ए-२०१,
२ रा मजला, गणेशमळा, सिंहगड रोड, पुणे ३०.
दूरध्वनी - २४२५४५३२

Post a Comment

0 Comments