Good Headmaster - ATG News

Breaking

Home Top Ad

Responsive Ads Here

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, January 17, 2017

Good Headmaster


              शाळेला चांगला मुख्याध्यापक  लाभणं, हे त्या शाळेचं मोठं भाग्य असतं. असा मुख्याध्यापक हा शाळेचा मानबिंदू असतो. पण दुर्दैवाने असंख्य शाळा या भाग्यापासून वंचितच राहतात. अनं मानबिंदूऐवजी 'कुंकवाच्या धन्या'वरच काम चालवतात.
             आज शिक्षणाचा दर्जा घसरण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे, चांगल्या मुख्याध्यापकांचा अभाव, हेही आहे. याचा अर्थ असा नव्हे, की चांगल्या मुख्याध्यापकांचा तुटवडा पडला आहे. या अभावाचं कारण मुख्याध्यापक पदासाठीची 'सेवाज्येष्ठता' ही एकमेव पात्रता असणे हे आहे.
             अनुभव ही महत्वपूर्ण बाब असली तरी, केवळ अनुभवाने कोणालाही ज्ञानप्राप्ती होत नसते. परिणामी अनुभवापेक्षाही मुख्याध्यापक हा सर्वप्रथम उत्तम शिक्षक असला पाहिजे. त्याचं अध्यापनावर जीवापाड प्रेम असलं पाहिजे. आपल्या विषयाचा तो परवलीचा शब्द असला पाहिजे. तो व्यासंगीही असला पाहिजे. त्यासाठी तो चौफेर वाचन करणारा असला पाहिजे. देशकाल आणि समाजाचं यथार्थ भान त्याला असलं पाहिजे. तो अभिरुचीसंपन्न असला पाहिजे. कला, काव्य, संगीताची त्याला उत्तम जाण असली पाहिजे. पालकवर्गाशी त्याचा सुसंवाद असला पाहिजे. विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकाच्या शब्दाचा, तर मुख्याध्यापकाच्या नजरेचा धाक वाटला पाहिजे. तरच त्याचा शालेय विश्वात आणि गावातही नैतिक दबदबा निर्माण होत असतो.
             कोणत्याही मुख्याध्यापकाचा नैतिक दबदबा हे त्याचं भांडवल आणि शाळेची ती गंगाजळी असते. अशा शाळा उर्जावान बनतात. ही उर्जाच विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रेरणादायक ठरत असते. मग अशा शाळा त्या मुख्याध्यापकाच्या नावाने ओळखल्या जाऊ लागतात. मुख्याध्यापक शाळेचे झाले की शाळाही मुख्याध्यापकाची होते. ही मुख्याध्यापकाची पुण्याईच त्याची खरी कमाई असते. तोच त्याचा सर्वोच्च बहुमान असतो. अन्य पुरस्कारांची त्याला गरज नसते.
             शाळेला अभिरुचीसंपन्न मुख्याध्यापक लाभणं म्हणजे दुग्धशर्करायोगच असतो. देखणा शालेय परिसर, सुंदर ग्रंथालय आणि त्यासाठी वेळोवेळी केलेली उत्तमोत्तम ग्रंथ खरेदी, विद्यार्थ्यांच्या वैयक्तीक कलागुणांना वाव देणारे स्नेहसंमेलनातले कार्यक्रम आणि स्नेहसंमेलनासाठी समाजसेवा, साहित्य, कला, संगीत, नाट्यादि क्षेत्रातली दिग्गज निमंत्रित मंडळी. अशा अनेक छोट्यामोठ्या गोष्टीतून मुख्याध्यापकाच्या अभिरुची संपन्नतेचं दर्शन घडत असते.
             शालेय परिसर आणि प्रत्येक वर्गावर मुख्याध्यापकाचे बारिक लक्ष असलं पाहिजे. देखरेख आणि प्रशासकीय कामासाठी वेळ देता यावा म्हणून मुख्याध्यापकांना, अध्यापनाच्या तासिका कमी असतात.
             आपण आधी शिक्षक आहोत व नंतर मुख्याध्यापक, याचा मुख्याध्यापकांना कदापि विसर पडता कामा नये. त्यामुळे कितीही महत्वाची कामं असली तरी, मुख्याध्यापकाने आपले तास घेतलेच पाहिजे. आपले तास शिक्षकांना घ्यायला सांगणे आणि आपले पेपराचे गठ्ठेही शिक्षकांकडूनच तपासून घेणे, हा संगीन शैक्षणिक गुन्हा आहे. अशा गुन्हेगार मुख्याध्यापकांना आपल्या सहकारी शिक्षकांच्या अडचणी, समस्या, प्रश्नांशी काहीही देणेघेणे नसते.
             तसेच अध्यापनाच्या समरभूमीवरच शिक्षकाची खरी कसोटी लागत असल्यामुळे मुख्याध्यापकाने वर्गावर न जाणे म्हणजे आपल्यातल्या शिक्षकाचा गळा घोटणे होय. अशाप्रकारे अध्यापनाशी आपली नाळ तोडणे, हा शिक्षकाचा अपमृत्यु असतो. मुख्याध्यापक वर्गावर गेले नाहीत तर विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी कळणार कशा? आणि ते ज्या वर्गाला शिकवतात त्या वर्गाचे पेपर त्यांनी तपासले नाहीत, तर त्या वर्गाचं बौद्धिक आकलन त्यांना होणार कसं? आणि मुलांना त्यांच्या चुका ध्यानात आणून मार्गदर्शन करणार कसं?
             मुख्याध्यापकाला सर्व शैक्षणिक कौशल्ये आत्मसात असली पाहिजे. त्यासाठी अध्यापनाचा त्याला लळा असला पाहिजे. कारण अध्यापनातूनच शिक्षकाच्या शैक्षणिक कौशल्यांचा विकास होत असतो. शैक्षणिक कौशल्यांचा विकास शिक्षकाला परिपूर्णतेकडे नेत असतो.
             दुर्दैवाने काही मुख्याध्यापकांचा कल अशैक्षणिक कौशल्ये आत्मसात करण्याकडे अधिक असतो. त्याची परिणती आपली शैक्षणिक कामं टाळण्याची अपप्रवृत्ती त्यांच्यात बळावते. काही मुख्याध्यापक वेळापत्रक बनवतानाच आपल्या नावावर अध्यापनाच्या विषयांऐवजी समाजसेवा, कार्यानुभव अशा वैकल्पिक विषयांच्या तासिका टाकून घेतात. आपल्या पदाच्या अशा गैरवापरामुळे, सहकारी शिक्षकांच्या नजरेतून ते उतरतात. त्यांच्याविषयीच्या आदराला ओहोटी लागते.
             इतकेच नव्हे तर काही मुख्याध्यापक एस्.एस्.सी. परीक्षेचे पेपर तपासण्याच्या कामातून मुक्तता व निवडणूकीच्या कामातून आपली सुटका करुन घेतात. असे कामचुकार आणि कर्मदरिद्री मुख्याध्यापक जेव्हा, विद्यार्थी आणि शिक्षकांपुढे तत्त्वज्ञान पाजळू लागतात, तेव्हा शिक्षकांना आपण शिक्षक असणं हे गतजन्माचं पातक वाटू लागतं. अशा खंतावलेल्या शिक्षकांच्या खिन्न सावल्यांनी एकूणच शिक्षणविश्व काळवंडले आहे.    
                                  ✍

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

Post Bottom Ad

Responsive Ads Here